शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यास कर्ज देणे आणि परतफेड करण्याची जी नैसर्गिक प्रणाली आहे ती नष्ट होईल असे भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी म्हटले. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. त्यासाठी त्यांनी ३६,००० कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली. आपल्या देशामध्ये कर्ज घेऊन प्रामाणिकपणे परतफेड करण्याची संस्कृती आहे. ही संस्कृतीच यामुळे नष्ट होईल असे पटेल यांनी म्हटले. सध्या या निर्णयामुळे काही जणांना दिलासा मिळाला तरी देखील भविष्य काळात यामुळे एक चुकीचा संदेश जाईल असे पटेल म्हणाले.

आज आरबीआयने आपले पतधोरण जाहीर केले. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्याच प्रकारे जर सातत्याने कर्जमाफी दिली तर त्याचा तणाव करदात्यांच्या खिशावर पडतो असे ते म्हणाले.  उत्तर प्रदेशात कर्जमाफी दिल्यानंतर महाराष्ट्रात देखील कर्जमाफीची मागणी होत आहे. उत्तर प्रदेशात या निर्णयामुळे अडीच कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. १ लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्यात येईल असे सरकारने सांगितले आहे. ज्या प्रमाणे उत्तर प्रदेशात कर्जमाफी झाली त्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील मिळावी असे आंदोलक आणि विरोधक म्हणत आहेत.

परंतु, १ लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी न देता पाच एकरपर्यंत जमीन असणाऱ्या सर्वांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली जात आहे. याआधी भारतीय स्टेट बॅंकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास विरोध दर्शवला होता. बॅंकाना बुडित कर्जामुळे फटका बसतो. त्या संदर्भात बोलताना ते म्हणाले. की बुडित कर्जे हा या प्रक्रियेचाच एक भाग आहे. त्यामुळे काही प्रमाणात तुम्हाला तो फटका बसत असेल तर तुम्हाला तो सहन करावाच लागेल. तुमचे नुकसान झाल्यावर दरवेळी सरकार तुमच्या मदतीला धावेल ही अपेक्षा करणे चुकीचे आहे असे ते म्हणाले.