राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी होत असलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तसेच, या बैठकीबाबत विविध प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावरून निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींविरोधात कितीही आघाड्या झाल्या तरी ते नंबर वनच राहातील, असं त्यांनी म्हटलं आहे.

रामदास आठवले म्हणाले, पंतप्रधान मोदींविरोधात अशा कितीही आघाड्या तयार होऊ द्या, त्याने काहीही फरक पडणार नाही.पंतप्रधान मोदींचं नेतृत्व अतिशय सक्षम आहे, त्यामुळेच ते पहिल्या क्रमांकावर आहेत. तसेच, आम्हाला शरद पवारांबद्दल आदर आहे, ते महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. त्यांनी अनेक चांगली कामेही केली आहेत. सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. असंही आठवलेंनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ‘राष्ट्रमंच’च्या बॅनरखाली विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होत आहे. तर,  या बैठकीवर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत निशाणा साधला आहे. या बैठकीत सहभागी होणाऱ्या काही नेत्यांची नावंही उपाध्ये यांनी घेतली आहेत.

एक नवा हास्यास्पद प्रयोग; शरद पवारांच्या घरी होणाऱ्या बैठकीवरून भाजपाचा चिमटा

“शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी बैठक… २० जण उपस्थित असणाऱ्यांची यादी पहाता संभाव्य आघाडी हा राजकारणात जनाधार गमावलेल्या नेत्यांचा केवळ बातमीत राहण्यापुरता केविलवाणा प्रयत्न असून, एक नवा हास्यास्पद प्रयोग यापलीकडे त्यातून काही निष्पन्न होणार नाही,” असं म्हणत केशव उपाध्ये यांनी बैठकीला उपस्थित राहणाऱ्यां नेत्यांच्या नावांचा उल्लेख केला आहे.