एकीकडे देशात रोज हजारावर करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रातही रोज शंभरावर करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. मात्र देशात एक राज्य असं आहे ज्या राज्यात गेल्या चार दिवसांत एकही करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही.

हे राज्य आहे उत्तराखंड. या राज्यात चार दिवसांपूर्वी करोना रुग्णांची संख्या ३५ होती. रविवारी संध्याकाळपर्यंत ही संख्या कायम राहिली आहे. गेल्या चार दिवसांत एकही करोना संशयित येथे पॉझिटिव्ह आढळला नसल्याची माहिती उत्तराखंडच्या आरोग्य खात्याने दिली आहे.

उत्तराखंडमध्ये रविवारी ९३ रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

महाराष्ट्रात १३४ नवे रुग्ण, मुंबईत १२ तासांत वाढले ११३ पॉझिटिव्ह
महाराष्टारीत करोना रुग्णांच्या संख्येत कोणतीही घट होताना दिसत नाही. उलट यात रोज भरच पडू लागली आहे. रविवारी दुपारपर्यंत महाराष्ट्रात १३४ नव्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यापैकी एकट्या मुंबईत ११३ रुग्ण आहेत. राज्यात एकूण करोना रुग्णांची संख्या आता १८९५ वर गेली असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.