संसदेच्या दोन्ही सभागृहात आज (बुधवार) कामकाजाला सुरूवात होताच गोंधळ सुरू झाला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारपर्यंत स्थगित करण्यात आले. राज्यसभा आणि लोकसभेत काँग्रेसचे सदस्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या माफीनाम्यावर ठाम आहेत. विनंती करूनही काँग्रेसचे सदस्य शांत होत नव्हते. संसदेत जे घडले नाही, त्याबाबत कोणाची माफी मागणे अयोग्य असल्याचे, राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केले. पण यावरही काँग्रेसचे सदस्य शांत बसण्यास तयार नव्हते. त्यामुळे अखेर कामकाज स्थगित करावे लागले.

संसदेत सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अरूण जेटली यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याचा काही उपयोग झाल्याचे दिसून आले नाही. विरोधी पक्षाचे सदस्य सातत्याने घोषणाबाजी करत कामकाजात अडथळा आणत आहेत.

राज्यसभा आणि लोकसभेत काँग्रेसचे सदस्य मोदींच्या माफीनाम्यावर ठाम आहेत. मोदी यांनी गुजरात निवडणुकीच्यावेळी प्रचारात मनमोहनसिंग हे पाकिस्तानबरोबर बसून आपल्याविरोधात कट रचत असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या वक्तव्यावरच काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे. माजी पंतप्रधानांचा हा अपमान असल्याचे काँग्रेसने म्हटले. त्यामुळेच अधिवेशन सुरू झाल्यापासून काँग्रेस मोदींकडून माफीची मागणी करत आहेत. आज कामकाज सुरू होताच काँग्रेसचे नेते ‘पीएम माफी मागा’, ‘सरकारची ठोकशाही नाही चालणार’ हे नारे देत वेलमध्ये आले.

यावर व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त केली. विरोध करण्याचा हा मार्ग नाही. कोणीही माफी मागणार नाही. या सभागृहात हे घडलेले नाही. त्याबाबत येथे माफी मागणे योग्न नाही. सभागृहाबाहेर हे वक्तव्य केल्याचे नायडू यांनी म्हटले. त्यानंतर त्यांनी राज्यसभेचे कामकाज स्थगित केले.