नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनात सहभागी झाल्याने नॉर्वे येथील परदेशी महिलेला भारत सोडायला लावल्याचं समोर आलं आहे. महिलेने फेसबुकवर आंदोलनातील फोटो शेअर केले होते. यानंतर तिची चौकशी करण्यात आली होती. शुक्रवारी महिलेने खुलासा करत आपल्याला देश सोडून जा अथवा कारवाईला सामोरं जाण्यास तयार राहा असं सांगण्यात आल्याची माहिती दिली होती. “इमिग्रेशनचा अधिकारी हॉटेलमध्ये आला होता. जोपर्यंत विमानाचं तिकीट बूक केलं नाही तोपर्यंत तो तिथेच थांबला होता,” अशी पोस्ट जोहान्सन फेसबुकवर शेअर केली आहे.

विदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाने (एफआरआरओ) जोहान्सन यांनी व्हिसा नियमांचं उल्लंघन केल्याने त्यांना देश सोडून जाण्याचा आदेश देण्यात आल्याचं सांगितलं आहे. याआधी आयआयटी मद्रासमध्ये शिकणाऱ्या जर्मनीच्या एका विद्यार्थ्याला नागरिकत्व कायद्याविरोधी आंदोलनात सहभागी झाल्याने देशाबाहेर काढण्यात आलं.

“काही तांसापूर्वी इमिग्रेशनचा अधिकारी पुन्हा एकदा माझ्या हॉटेलमध्ये आला. त्यांनी मला देश सोडून जा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल असं सांगितलं. मला स्पष्टीकरण देण्यास तसंच काहीतरी लिहून देण्यासही सांगण्यात आलं. तुम्हाला काहीही लिखित मिळणार नाही असंही अधिकाऱ्यांनी मला सांगितलं,” असं जोहान्सन यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.

“जोपर्यंत मी परतीचं तिकीट काढत नाही तोपर्यंत आपण येथून जाणार नसल्याचं अधिकारी सांगत आहेत. लवकरच मी माझ्या परतीच्या प्रवासासाठी विमानतळाकडे रवाना होईन. माझा एक मित्र दुबईच्या तिकीटाची व्यवस्था करत आहेत. तिथून मी माझ्या घरी स्विडनसाठी जाईन,” असंही जोहान्सन यांनी पोस्टमध्ये सांगितलं आहे.

जोहान्सन यांनी कोचीमधील आंदोलनात सहभाग घेतला होता. फेसबुकवर त्यांनी आंदोलनतील फोटो शेअर केले होते. कारवाईबद्दल सांगताना एफआरआरओने माहिती दिली आहे की, “आमच्या तपासात त्यांनी व्हिसाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आलं. यामुळे त्यांना पुन्हा मायदेशी परतण्यास सांगण्यात आलं”.