भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी मला दोषी सिद्ध करून दाखवावे मी स्वत:हून तुरूंगात जाईन, असे आव्हान दिले आहे.

राहुल गांधी यांच्याजवळ तुर्कीचे नागरिकत्व असल्याचा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. तसेच राहुल आणि सोनिया गांधी यांना पाणबुड्यांचे पार्ट निर्यात करणाऱया एका फ्रेंच कंपनीकडून दलाली मिळत असल्याचाही घणाघात सुब्रमण्यम यांनी केला आहे. सुब्रमण्यम स्वामींच्या या आरोपांना राहुल गांधी यांनी गुरूवारी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ९८ व्या जयंतीच्या निमित्ताने दिल्लीत आयोजित युथ काँग्रेसच्या मेळाव्यात सुब्रमण्यम यांचे नाव न घेता प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, मोदींनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की मी त्यांना अजिबात घाबरत नाही. त्यामुळे त्यांच्या नेत्यांकडून होणाऱया आरोपांनी मी घाबरून जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपात तथ्य आढळल्यास माझी तुरूंगात जाण्याची तयारी आहे. त्यांनी फक्त आरोप सिद्ध करून दाखवावेत.

स्वयंसेवक संघावरही राहुल यांनी यावेळी निशाणा साधला. इंदिरा गांधी, माझे वडिल आणि माझी आई यांच्यावर संघ आणि भाजपकडून आजवर होत आलेली चिखलफेक मी लहानपणापासून पाहत आलो आहे. पण, त्यातील एकही आरोप आजवर सिद्ध झालेला नाही. सध्या मोदींचे सरकार आहे. त्यामुळे माझ्यावरील आरोप सिद्ध करून दाखवा आणि दोषी आढळल्यास मला तरुंगात धाडा, असे राहुल पुढे म्हणाले.