“जर एखाद्याला ‘वंदे मातरम’ म्हणायचे नसेल तर त्याला आपण देशद्रोही किंवा देशविरोधी असल्याचे लेबल लाऊ शकत नाही”, असे स्पष्ट मत केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी व्यक्त केले आहे. सध्या देशात वंदे मातरम हे गीत म्हणण्यावरून बराच खल सुरु आहे यावर नक्वी यांना आपली भूमिका स्पष्ट केली.


“‘वंदे मातरम’ म्हणणे किंवा न म्हणणे हे प्रत्येकाच्या वैयक्तिक आवड आणि विचारांवर अवलंबून आहे. ‘वंदे मातरम’ न म्हणण्याचा संबंध देशभक्तीशी जोडता येणार नाही. जर एखाद्याला ‘वंदे मातरम’ म्हणायचे नसेल तर त्याला आपण देशद्रोही किंवा देशविरोधी असल्याचे लेबल लाऊ शकत नाही. मात्र, जर एखादा ‘वंदे मातरम’च्या विरोधात असेल तर अशी मानसिकताही योग्य नाही”, असे नक्वी म्हणाले.

नुकताच मद्रास उच्च न्यायालयाने यासंदर्भात एक निर्णय दिला आहे. यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत म्हणणे अनिवार्य करण्याचे आदेश दिले आहेत. यावरून सध्या महाराष्ट्रात राजकीय क्षेत्रात बराच खल सुरु आहे.

समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी या प्रकरणी प्रतिक्रीया देताना म्हणाले की, मला या देशातून हाकलून दिले तरी आपण ‘वंदे मातरम’ म्हणणार नाही. त्याचबरोबर एमआयएमचे मुंबईतील आमदार वारीस पठाण यांनी देखील आपल्या डोक्याला कोणी पिस्तूल लावले तरी आपण ‘वंदे मातरम’ म्हणणार नाही असे म्हटले होते. त्याचबरोबर जर या देशात रहायचे असेल तर ‘वंदे मातरम’ म्हणावेच लागेल, असे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले होते. त्याचबरोबर अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या बाजूने भूमिका घेतली होती.