‘कभी किसी को मुक्कमल जहां नहीं मिलता’ या सारख्या गीतांमधून रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेले उर्दूतील प्रख्यात शायर कवी आणि गीतकार निदा फाजली यांचे सोमवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. अनेक गाजलेल्या गीतांच्या माध्यमातून निदा फाजली यांनी रसिकांच्या मनात घर केले होते.
निदा फाजली यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९३८ रोजी दिल्लीमध्ये झाला. वडीलही उर्दू शायरी आणि गीतलेखन करीत असल्याने त्यांच्यामुळेच निदा फाजली यांना या साहित्य प्रकाराबद्दल रुची निर्माण झाली. सूरदास यांच्या एका काव्यसंग्रहामुळे प्रभावित होऊन निदा फाजली यांनी कवी होण्याचा निर्णय घेतला होता.
ग्वालियर महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते करिअर करण्याच्या उद्देशाने १९६४ मध्ये मुंबईत आले. सुरुवातीच्या काळात त्यांनी धर्मयुग आणि ब्लिट्ज या नियतकालिकांमधून लेखन केले. मीर आणि गालिब यांच्या रचनांमुळे निदा फाजली विशेष प्रभावित होते. सत्तरच्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपटांसाठी गीतलेखन करायला सुरुवात केली. दहा वर्षांच्या संघर्षानंतर त्यांनी १९८० मध्ये ‘आप तो ऐसे न थे’ या चित्रपटासाठी लिहिलेले ‘तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है’ हे गीत चांगलेच गाजले. या गाण्यानंतर त्यांना अनेक मोठ्या चित्रपटांसाठी गीत लेखनाचे प्रस्ताव मिळू लागले. त्यामध्ये ‘बीबी ओ बीबी’, ‘आहिस्ता-आहिस्ता’ आणि ‘नजराना प्यार का’ या चित्रपटांचा समावेश होता. या काळात त्यांनी अनेक छोट्या चित्रपटांसाठी गीतलेखन केले. निदा फाजली यांनी लिहिलेले आणि खय्याम यांचे संगीत लाभलेले ‘कभी किसी को मुक्कमल जहां नहीं मिलता’ हे गाणे आजही अनेक रसिकांच्या मनात घर करून राहिले आहे.
गझलगायक दिवंगत जगजित सिंह यांनी निदा फाजली यांच्या अनेक रचना आपल्या कार्यक्रमांमधून लोकांसमोर सादर केल्या आणि त्या पसंतीसही उतरल्या. १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सरफरोश’ या चित्रपटांसाठी निदा फाजली यांनी लिहिलेले ‘होश वालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है’ भी शामिल है’ हे गाणेही चांगलेच गाजले.