राष्ट्रीय पाहणी याच महिन्यात

नवी दिल्ली : करोना विषाणूच्या प्रादूर्भावाचा देशव्यापी आढावा घेण्यासाठी चौथे सिरो सर्वेक्षण या महिन्यात, जूनमध्ये सुरू केले जाईल. राष्ट्रीय स्तरावर सर्वेक्षण होत असले तरी, राज्यनिहाय सिरो सर्वेक्षण केले पाहिजे, अशी सूचना करोना कृतिगटाचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी शुक्रवारी केली.

राष्ट्रीय स्तरावर सर्वेक्षण केल्याने करोनासंसर्गाची सरासरी आकडेवारी मिळू शकते. मात्र, राज्य स्तरावर हे सर्वेक्षण केल्यास संबंधित राज्यांमध्ये कोणत्या भौगोलिक क्षेत्रात करोनाचा अधिक प्रादुर्भाव झाला आहे, हे समजू शकेल. त्यानुसार करोना नियंत्रणाचे उपाय लागू करता येतील. त्यामुळे राष्ट्रीय सिरो सर्वेक्षणावर अवलंबून न राहता राज्यांनीही सर्वेक्षण करणे गरजेचे आहे, असे मत पॉल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

एखाद्या व्यक्तीच्या रक्तात प्रतिपिंडे आढळली तर तिला करोनाचा संसर्ग होऊन गेलेला असू शकतो, या आधारावर देशातील किती टक्के लोकसंख्येला करोनाची बाधा झाली असेल, याचा अंदाज सिरो सर्वेक्षणातून काढला जातो. देशात करोनाचा समूह संसर्ग झाला आहे का, याचीही पडताळणी सर्वेक्षणातून करता येईल. देशव्यापी सिरो सर्वेक्षणाची तयारी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) केली जात असून जूनमध्ये हे सर्वेक्षण केले जाईल. २१ राज्यांतील ७० जिल्ह्यांमध्ये सर्वसामान्य व्यक्ती तसेच, आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या रक्ताचे नमुने गोळा केले जातील.

देशातील करोनास्थिती

दैनंदिन रुग्णवाढ ७८ टक्क्यांनी कमी. ७ मे रोजी ४.१४ लाख रुग्णवाढ, ११ जून रोजी ती ९१ हजार ७०२.

गेले चार दिवस रुग्णवाढ १ लाखांपेक्षा कमी. गेल्या आठवड्यांत दैनंदिन रुग्णवाढ ३३ टक्क्यांनी कमी.

१०० पेक्षा जास्त दैनंदिन रुग्णवाढीचे जिल्हे ५३१ (४ मे रोजी), आता फक्त १९६ जिल्हे (११ जून).

१० मे रोजीच्या रुग्णवाढीच्या शिखरानंतर उपचाराधीन रुग्णांमध्ये ७० टक्के घसरण. ही संख्या २६.२ लाखांनी कमी झाली. ११ जून रोजी उपचाराधीन रुग्ण ११.२१ लाख.

रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण आता ९४.९ टक्क्यांवर.

४-१० जून या आठवड्यात संसर्गदर ५.६ टक्के. शिखर कालावधीत तो सरासरी २१.६७ टक्के. गेल्या २४ तासांत संसर्गदर ४.४९ टक्के.

अडीच महिन्यांनंतर संसर्गदर ५ टक्क्यांहून कमी.

‘बायोलॉजिकल इ’ च्या लशीला अमेरिकेत तिसऱ्या

टप्प्यातील चाचण्यांसाठी परवानगी

वॉशिंग्टन : टेक्सासमधील बेलर कॉलेज ऑफ मेडिसीन व हैदराबादच्या ‘बायोलॉजिकल इ’ यांच्या सहकार्यातून तयार झालेल्या कोविड प्रतिबंधक लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना अमेरिकेत परवानगी मिळाली असून रिपब्लिकन पक्षाचे काँग्रेस सदस्य मायेकल मॅकॉल यांनी या घडामोडींचे स्वागत केले आहे.  भारत सरकारने लशीच्या तीस कोटी मात्रांची आगाऊ खरेदी करण्याची तयारी दर्शवली असून मॅकॉल यांनी गुरुवारी सांगितले, की टेक्सासमधील ह्यूस्टनच्या  चिल्ड्रेन हॉस्पिटल येथे या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना मंजुरीनंतर सुरुवात झाली आहे. मॅकॉल हे काँग्रेसच्या परराष्ट्र संबंध विषयक समितीचे सदस्य आहेत.

राज्ये, केंद्रशासित प्रदेशांकडे लशींच्या १.१७ कोटींहून अधिक मात्रा उपलब्ध

नवी दिल्ली : राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अद्यापही १.१७ कोटींहून अधिक लशी उपलब्ध आहेत आणि पुढील तीन दिवसात त्यांच्याकडून ३८ लाखांहून अधिक मात्रा स्वीकारल्या जातील, असे शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत २५.६० कोटी मात्रा विनामूल्य आणि राज्य सरकारकडून थेट खरेदीच्या स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकी वाया गेलेल्या लशींसह एकूण २४ कोटी ४४ लाख सहा हजार ०९६ मात्रांचा वापर करण्यात आला आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.