जम्मू-काश्मीरला स्वयत्ततेचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून भारताविरोधातला द्वेष उफाळून आला आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने देशात भारतीय चित्रपट आणि टीव्ही शोजवर प्रदर्शनास बंदी घातली होती. त्यानंतर आता भारतात तयार झालेल्या आणि भारतीय कलाकारांनी काम केलेल्या जाहिरातींवर बंदी आणली आहे. पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अॅथॉरिटीने (PEMRA) हा निर्णय घेतला आहे.

PEMRA ने बुधवारी यासंदर्भात अधिकृत पत्रक काढून याची माहिती दिली. यामध्ये म्हटले आहे की, भारतीय कलाकारांना पाकिस्तानातील टीव्हीवर पाहताना पाकिस्तानी जनतेच्या भावना दुखवल्या जात आहेत. भारतीय कालाकारांनी काम केलेल्या डेटॉल, सर्फ एक्सेल, नॉर, पॅन्टिन, सुफी, हेड अॅण्ड शोल्डर, फेअर अॅण्ड लव्हली, लाईफबॉय, सेफगार्ड आणि फॉग आदी जाहिरातींवर पाकिस्तानने बंदी घातली आहे.

कलम ३७० रद्द केल्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी समर्थन केले होते. यामध्ये विद्युत जामवाल, सोनू सूद, मधुर भांडारकर, अनुपम खेर आदी कालाकारांचा समावेश होता. दरम्यान, पाकिस्तानमध्ये भारतीय सिनेमे मोठ्या प्रमाणावर पाहिले जातात.

बॉलिवूडचे स्टार कलाकार शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान हे पाकिस्तानात प्रचंड लोकप्रिय आहेत. पाकिस्तानात भारतीय चित्रपटांची पायरसी देखील मोठ्या प्रमाणावर होते.