सीबीआय अधिकारी राकेश अस्थाना यांच्या विरोधात लाचखोरीच्या प्रकरणाची आणि भ्रष्टाचाराची चौकशी सुरु असताना सीबीआयचे डीआयजी मनिष कुमार सिन्हा यांची बदली नागपूरला करण्यात आली. या निर्णयाला सिन्हा यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. एवढंच नाही तर अस्थानाच्या यांच्या चौकशी दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ढवळाढवळ केल्याचाही आरोप केला आहे. या संदर्भात त्यांनी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली आहे. असं असलं तरीही सुप्रीम कोर्टाने त्यांच्या याचिकेवर त्वरित सुनावणी करण्यास नकार दिला आहे.

एम. के. सिन्हा यांनी सरकारवरही आरोप केले आहेत. राकेश अस्थाना यांच्यावर जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हा त्यांच्या विरोधात चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीवर मनिष कुमार सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली लक्ष ठेवण्यात येत होते. आता मात्र त्यांनी अजित डोवाल आणि सरकारवर हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे. राकेश अस्थाना यांच्या घरी जेव्हा आम्ही झडतीसाठी गेलो होतो तेव्हा आम्हाला अजित डोवाल यांनी घराची झडती घेऊ नका असे बजावल्याचे मनिष कुमार सिन्हा यांनी म्हटले आहे.

एवढेच नाही तर मोदींच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचेही नाव मनिष कुमार सिन्हा यांनी घेतले आहे. कोळसा आणि खाण राज्य मंत्री हरिभाई चौधरी यांनी लाचखोरी प्रकरणात राकेश अस्थानांची मदत केल्याचे सिन्हा यांनी म्हटले आहे. हरिभाई चौधरी हे गुजरातचे खासदार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात. आता या आरोपांवर सरकार काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

एका रात्रीत सीबीआय अधिकारी राकेश अस्थाना यांची चौकशी करणाऱ्या पूर्ण पथकाला हटवण्यात आले होते. काही जणांची बदली करण्यात आली तर काहींना या प्रकरणापासून दूर राहण्यास सांगण्यात आले होते असाही आरोप सिन्हा यांनी त्यांच्या याचिकेत केला आहे.