देशात सलग तिसऱ्या दिवशी करोनाच्या रुग्णसंख्येत १९ हजारांहून अधिक वाढ झाली. गेल्या २४ तासांमध्ये १९ हजार ४५९ रुग्णांची भर पडली. त्यामुळे देशातील करोनाबाधितांची संख्या ५ लाख ४८ हजार ३१८ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत ३८० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या १६ हजार ४७५ वर पोहोचली.

देशभरात गेल्या सहा दिवसांमध्ये १.१ लाख रुग्णांची वाढ झाली आहे. या सहा दिवसांमध्ये प्रतिदिन रुग्णवाढ १५ हजारांपेक्षा अधिक आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये १२ हजार १० रुग्ण बरे झाले असून, बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३ लाख २१ हजार ७२३ झाली आहे. देशात २ लाख १० हजार १२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५८.६७ टक्के आहे.

महाराष्ट्र, दिल्ली आणि तमिळनाडू या तीन राज्यांत रुग्णवाढ जास्त आहे. गेल्या सहा दिवसांपासून दिल्लीतील रुग्णांची वाढ सातत्याने तीन हजारांहून अधिक आहे. महाराष्ट्राप्रमाणे दिल्लीतही रक्तद्रव उपचारपद्धतीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.