भारतासह अन्य १९ देशांमधून चीनमध्ये परतण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांना चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या कोविड-१९ लसीची मात्रा घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय चीनने घेतला आहे.

ज्या लोकांनी चीनमध्ये तयार करण्यात आलेली लस घेतली असेल आणि त्यांच्याकडे लसीकरणाचे प्रमाणपत्र असेल त्यांना भारतातील चीनचे दूतावास आणि वकिलातींकडून व्हिसा देण्यात येईल, अशी नोटीस दिल्लीतील चीनच्या दूतावासावर लावण्यात आली आहे.

भारतात चीनमध्ये तयार करण्यात आलेली लस उपलब्ध नसल्याने भारतीयांना ती लस कशी मिळणार हे दूतावासावर लावण्यात आलेल्या नोटिशीमध्ये स्पष्ट करण्यात आलेले नाही. जवळपास २३ हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी आणि चीनमध्ये काम करणारे अन्य व्यावसायिक करोनाच्या निर्बंधांमुळे गेल्या वर्षीपासून भारतात अडकून पडले आहेत.