भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिमांमधील मागासवर्गीय घटकांपर्यंत पोहोचण्याची गरज व्यक्त केली. ‘मुस्लिम समुदायातील मागासवर्गीय घटकांपर्यत पोहोचण्याची आवश्यकता आहे,’ असे पंतप्रधान मोदी यांनी भुवनेश्वरमधील अधिवेशनात बोलताना म्हटले. यावेळी पंतप्रधान मोदींनी ‘सब का साथ सब का विकास’चा पुनरुच्चार केला.

मुस्लिमांमधील मागासवर्गीय घटकांपर्यंत पोहोचण्याची गरज असल्याचे विधान पंतप्रधान मोदींनी केल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. मुस्लिमांमधील मागासवर्गीय घटकांच्या आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याच्या विधेयकाबद्दलही भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात चर्चा झाली. मागासवर्गीय जातींच्या राष्ट्रीय आगोयाला घटनात्मक दर्जा देण्याबद्दलचे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. मात्र या विधेयकाला राज्यसभेत विरोध होतो आहे. या नव्या कायद्यामुळे संसदेला कोणत्याही जातीचा समावेश अनुसूचित जातींमध्ये करण्याचे अधिकार मिळणार आहेत.

याविषयी बोलताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी विरोध पक्षांवर जोरदार टीका केली. ‘आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात यावा, अशी मागणी इतर मागासवर्गीय जातींकडून गेल्या ३० वर्षांकडून केली जाते आहे. मात्र काँग्रेसने मतपेढीचे राजकारण करण्याला पसंती दिली. हे अतिशय दुर्देवी आहे,’ असे म्हणत जावडेकर यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने तयारी सुरु केली आहे. भाजपला अद्याप ओडिशात हातपाय पसरता आलेले नाहीत. त्यामुळेच दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनासाठी भाजपकडून ओडिशाची निवड करण्यात आली. अधिवेशनाला उपस्थित राहण्याआधी पंतप्रधान मोदींनी रोड शो केला होता.