काश्मीरमधील असंतोषाने ४३ वा दिवस गाठला असताना माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वात जम्मू- काश्मीरातील विरोधी पक्ष नेत्यांनी शनिवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली आणि काश्मीर प्रश्नावर राजकीय तोडगा काढण्यास केंद्र सरकारला सांगावे अशी विनंती केली.
काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित होण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे, नॅशनल कॉन्फरन्सचे कार्याध्यक्ष असलेले ओमर यांनी काश्मीरचा मुद्दा हा प्रामुख्याने राजकीय स्वरूपाचा आहे, हे मानण्यास केंद्र सरकार अपयशी ठरल्याची टीका केली.
२० विरोधी पक्षनेत्यांचा समावेश असलेल्या या शिष्टमंडळाने काश्मीरमध्ये राष्ट्रपतींना हस्तक्षेपाची विनंती करतानाच, त्यांना एक निवेदन सादर करून राज्यातील ‘चिघळणाऱ्या’ परिस्थितीची कल्पना दिली.
खोऱ्यातील नागरिकांविरुद्ध प्राणघातक बलाचा वापर थांबवण्यासाठी राष्ट्रपतींनी आपल्या प्रभावाचा वापर करावा, अशी विनंती शिष्टमंडळाने केल्याचे ओमर यांनी सांगितले.
काश्मीर खोऱ्यात गेल्या ४२ दिवसांपासून धुमसत असलेली आग जम्मूतील पीरपंजाल व चिनाब खोऱ्यात तसेच कारगिल भागात पसरण्यास याआधीच सुरुवात झाली असल्याचेही ओमर म्हणाले. काश्मीरमधील राजकीय मुद्दय़ावर तोडगा शोधण्यासाठी आणखी उशीर न करता, सर्व संबंधितांच्या सहभागाने राजकीय संवादाची अर्थपूर्ण आणि विश्वासार्ह प्रक्रिया सुरू करण्यास आपण केंद्र सरकारला सांगावे अशी विनंती आम्ही राष्ट्रपतींना केली आहे, असे ओमर म्हणाले. काश्मीरमधील परिस्थिती राजकीय दृष्टिकोनातून हाताळण्याबाबत केंद्राची नकारात्मक भूमिका निराशाजनक असून त्याचा राज्यातील शांतता व स्थैर्यावर दीर्घकालीन गंभीर परिणाम होऊ शकतो, असे मत अब्दुल्ला यांनी व्यक्त केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 21, 2016 12:46 am