नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातून केंद्रीय मंत्री उमा भारती यांचा राजीनामा घेतल्याची चर्चा रंगली असतानाच एक ट्विट करून उमा भारती यांनी चर्चा करणाऱ्यांना शांत केले आहे. मी ‘राजीनाम्याचा प्रश्न ऐकलाच नाही, ऐकणारही नाही आणि त्यावर काहीही बोलणारही नाही’ या आशयाचा ट्विट उमा भारती यांनी केला आहे.

आपल्या तिखट आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी उमा भारती प्रसिद्ध आहेत. त्यामुळे राजीनाम्याच्या प्रश्नावरही उमा भारती यांनी अशीच तिखट प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे  मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात जे काही भाष्य करायचे आहे ते करतील मला यासंबंधी बोलण्याचा अधिकार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार शनिवारी किंवा रविवारी केला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळातून ६ ते ८ नेत्यांना डच्चू दिला जाणार असल्याची चर्चा आहे. राजीवप्रताप रूडी, संजीव बालियान आणि फग्गनसिंह कुलास्ते यांनी मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधानांना पाठवला आहे.  तर उमा भारती यांचा राजीनामाही घेतला गेला आहे अशी चर्चा रंगली होती. मात्र एक ट्विट करून उमा भारती यांनी या चर्चेला उत्तर दिले आहे.

दरम्यान राजीनाम्याबाबत जो काही निर्णय आहे तो पक्षाचा निर्णय आहे, माझा नाही अशी प्रतिक्रिया राजीवप्रताप रूडी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. पक्षाने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचा आदर करून करून मी राजीनामा दिला आहे अशी प्रतिक्रिया रूडी यांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी संध्याकाळीच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचेही काही पूर्वनियोजित कार्यक्रम रविवारी आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर शनिवारीच विस्तार केला जाऊ शकतो अशी शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे ६ ते ८ मंत्र्यांकडून राजीनामे घेतले जाऊ शकतात आणि त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. नेमके काय होणार ते आता स्पष्ट होईलच. तूर्तास  टीका आणि चर्चा करणाऱ्यांना उमा भारती यांनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्याचे त्यांच्या ट्विटवरून स्पष्ट होते आहे.