राम जन्मभूमीवर फक्त राम मंदिरच उभारले जाईल, असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. ‘राम मंदिरावर लवकरच भगवा ध्वज फडकताना दिसेल आणि हा दिवस आता दूर नाही,’ असेही त्यांनी म्हटले. कर्नाटकमधील उडुपीमध्ये आयोजित धर्मसंसदेत बोलताना भागवत यांनी हे वक्तव्य केले. ५ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिराबद्दल सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. त्याआधी भागवत यांनी केलेले हे विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

कर्नाटकमधील उडुपीमध्ये विश्व हिंदू परिषदेने धर्मसंसदेचे आयोजन केले आहे. यामध्ये बोलताना, राम जन्मभूमीवर केवळ राम मंदिर उभारले जाईल. त्या ठिकाणी दुसरी कोणतीही वास्तू उभारली जाणार नाही,’ असे भागवत म्हणाले. ‘अयोध्येत लवकरच राम मंदिराची उभारणी केली जाईल. याठिकाणी आणण्यात आलेल्या शिळांच्या मदतीने राम मंदिर उभारले जाईल,’ असे त्यांनी म्हटले. अयोध्या वादावर तोडगा काढण्यासाठी आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर काही दिवसांपासून प्रयत्न करत असताना भागवत यांनी हे विधान केले.

यावेळी मोहन भागवत यांनी गोरक्षकांच्या मुद्द्यावरुही भाष्य केले. ‘लोकांकडून आमच्या गोरक्षकांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. गायीचे रक्षण ही आमची संस्कृती आहे. जोपर्यंत गोहत्येवर बंदी आणली जात नाही, तोपर्यंत आम्ही शांतपणे जगू शकत नाही,’ असे त्यांनी म्हटले. कर्नाटकमध्ये तीन दिवस धर्मसंसद चालणार असून यामध्ये राम मंदिर आणि हिंदू धर्माशी संबंधित विषयांवर चर्चा होणार आहे. यामध्ये ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रवीशंकर आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील सहभागी होण्याची शक्यता आहे.

जन्मभूमीचा वाद संपुष्टात आणण्यासाठी श्री श्री रवीशंकर प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना शिया वक्फ बोर्डानेदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शिया वक्फ बोर्डाने राम मंदिर आणि बाबरी मशिदीचा वाद सोडवण्यासाठी एक प्रस्ताव दिला आहे. अयोध्येत राम मंदिर, तर लखनौमध्ये बाबरी मशीद उभारली जावी, असे शिया वक्फ बोर्डाने प्रस्तावात नमूद केले आहे. लखनौमध्ये उभारण्यात येणाऱ्या मशिदीला कोणत्याही मुस्लिम शासकाचे नाव न देता मस्जिद-ए-अमन म्हटले जावे, असेही बोर्डाने सुचवले आहे. यामुळे हिंदू आणि मुस्लिमांमधील अनेक वर्षांपासून सुरु असलेला वाद संपुष्टात येईल, अशी आशाही व्यक्त करण्यात आली आहे.