भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे पावणेचार वाजता पाकिस्तानातील बालाकोट येथील जाभामधील जैश-ए-महम्मदच्या तळावर हवाई हल्ले करीत ते तळ उद्ध्वस्त केले. पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४१ जवान ‘जैश-ए-महम्मद’च्या भीषण हल्ल्यात शहीद झाल्याच्या १२ व्या दिवशी झालेल्या या दमदार कारवाईचे देशवासियांनी जल्लोषात स्वागत केले आहे. मात्र आता या हल्ल्याची केवळ सात जणांनाच पूर्व कल्पना असल्याची माहिती समोर येत आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे मुख्य राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बॉल्टन यांना फोनवरुन या हल्ल्याची कल्पना दिली होती. हल्ला कसा होणार आणि भारताच्या सुरक्षेसाठी तो महत्वाचा का आहे हे डोवाल यांनी बोल्टन यांना या वेळेस पटवून दिले.

मात्र या हल्लाच्याती तयारी पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या बसवर आत्मघाती हल्ला झाला त्यानंतर लगेचच सुरु झाली होती. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार गुप्तचर यंत्रणांमधील अनेक वरिष्ठ सुरक्षा सल्लागारांनी दिलेल्या माहीतीनुसार पुलवामा हल्ल्याला उत्तर देण्याचा निर्णय भारताने १४ तारखेलाच घेतला होता. १४ तारखेचा हल्ला झाल्यानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि ‘रॉ’ ला पाकिस्तानमधील कोणत्या ठिकाणांवर हल्ले करु शकतो यासंदर्भातील माहिती गोळा करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर ‘रॉ’ने सहा ठिकाणांची यादी दिली. यामध्ये जैशचा सर्वात जुना तळ असणाऱ्या बालाकोट पहिल्या क्रमांकवर होते.

‘जैश-ए-महम्मद’ला धडा शिवण्याबरोबरच अनेक अर्थाने बालाकोट हे भारतासाठी योग्य टार्गेट होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्यामुळे जैशेला धडा शिकवता येईल या पहिल्या मुख्य मुद्द्याबरोबरच दुसरा महत्वाचा मुद्दा ठरला तो म्हणजे बालाकोटवर होणारा हल्ला जास्त नुकसान करणारा ठरेल. पुलवामामध्ये ज्या प्रकारचा हल्ला जैशेने केला तितक्याच प्रमाणात त्यांचे नुकसान करणार हा हल्ला ठरेल असे अधिकाऱ्यांचे मत होते. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बालाकोट हा डोंगराळ परिसरातील भाग असल्याने तेथे सामान्य पाकिस्तानी नागरिक असण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे नागरिकांवर हल्ला केल्यावरुन पाकिस्तानला आरडाओरड करण्याची संधीच न देणे हा मुळ उद्देश बालाकोटची निवड करता होता. चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे हा हल्ला पुलवामाचा बदला न वाटता भारताने आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने केलेला हल्ला वाटावा अशापद्धतीने बालाकोटची निवड करण्यात आली.

या हल्ल्याचे सर्व नियोजन झाल्यानंतर त्यासंदर्भातील माहिती पंतप्रधान मोदींना देण्यात आली. मोदींने १८ फेब्रुवारी रोजी या हल्ल्यासाठी होकार दिला. गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ सात जणांना या हल्ल्याची माहिती होती. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रमुख, रॉ तसेच आयबीच्या प्रमुखांचा यामध्ये समावेश होता.

२२ तारखेपासून भारतीय हवाई दलाच्या वेगवेगळ्या हवाई अड्ड्यांवरुन विमाने सरावांसाठी उड्डाणे करु लागली. २५ फेब्रुवारी रोजी गुप्तचर यंत्रणांना बालाकोट येथील जैशच्या तळावर मोठ्या संख्येने दहशतवादी उपस्थित असल्याची माहिती मिळाली. अंदाजे ३०० ते ३५० दहशतवादी बालाकोटमध्ये असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागल्यानंतर तातडीने हवाई हल्ला करण्याचा निर्णय घेण्यात आला. हल्ल्याच्या काही तास आधी मोदींना पुन्हा एकदा या हल्ल्याची पुन्हा एकदा कल्पना देण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच डोवाल, तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख आणि रॉ तसेच गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख असे सर्वच जण संपूर्ण रात्रभर या हल्ल्यावर लक्ष ठेऊन होते. रात्री दीड वाजता ग्वालेयर हवाई अड्यावरुन उड्डाण केले. त्यानंतर मोहिम पूर्ण करुन चार वाजता सर्व विमाने सुखरुप परतली. त्यानंतर लगेचच संरक्षण मंत्री निर्मला सितारमन यांना या हल्ल्याची माहिती देण्यात आल्याचे हिंदुस्तान टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

या हल्ल्यानंतर सायंकाळपर्यंत बावचळलेल्या पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत सात ठिकाणी शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत गोळीबार सुरू केला असून भारतीय सैन्य त्यासही चोख प्रत्युत्तर देत आहे. मंगळवारी पहाटे झालेल्या कारवाईची माहिती देताना परराष्ट्र सचिवांनी मात्र ही लष्करी कारवाई नसून प्रतिबंधात्मक होती, त्यात पाकिस्तानी सुरक्षा दले, आस्थापना आणि नागरी वस्त्यांची कोणतीही हानी झालेली नाही, असे स्पष्ट केले. भारतीय हवाई दलाने आंतरराष्ट्रीय नियमांचे काटेकोर पालन करीत ही कारवाई पार पाडली.