बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ही देशाच्या राजकारणातील दिग्गज नावं. हेच सगळे दिग्गज पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत थोपवू शकतात, असं काही महिन्यांपूर्वी सांगितलं जात होतं. पण सध्या नितीशकुमार हे भाजपच्या कळपात गेले आहेत. अरविंद केजरीवाल सध्या चिडीचूप आहेत. मायावती गप्पगार, ममता राज्याच्या राजकारणातच व्यग्र आणि राहुल गांधींना पक्षातील नेत्यांकडूनच होणारा विरोध यामुळं सध्या नरेंद्र मोदींना २०१९ च्या निवडणुकीत टक्कर देणारा नेताच विरोधकांकडे नाही, अशी चर्चा आता देशाच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

भाजपनं २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा केली. या निवडणुकीत आलेल्या मोदीलाटेत सगळ्याच पक्षांचा सुपडासाफ झाला. मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. पण देशात मोदीलाट नसल्याचा दावा काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी अनेकदा केला होता. पण मोदींच्या तीन वर्षांच्या कालावधीत अनेक राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ही मोदीलाट कायम असल्याचं वारंवार दिसून आलं. मोदी सरकार सत्तेत येऊन तीन वर्षे पूर्ण झाली तरी मोदी लाट ओसरली नसल्याचेच दिसते. ही मोदी लाट थोपवणाऱ्या दिग्गज चेहऱ्यांची नावं विरोधकांकडून घेण्यात आली. या नावांमध्ये नितीशकुमार यांचं नाव आघाडीवर होतं. तर राहुल गांधी, मायावती, अरविंद केजरीवाल ही नावंही अधूनमधून घेतली जात होती. पण देशाचं राजकारण या तीन वर्षांत पुरतं बदलून गेलं आहे. मोदींना टक्कर देणारी जी नावं घेतली जात होती, ती आता मागे पडली आहेत, असं सध्याचं चित्र आहे. नितीशकुमार यांनी भाजपच्या पाठिंब्यानं बिहारमध्ये सत्ता स्थापन केली आहे. पंजाबमधील निवडणुकांमध्ये बसलेल्या पराभवाच्या दणक्यानंतर अरविंद केजरीवाल हे चिडीचूप आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मायावती गप्पगार झाल्या आहेत. ममता बॅनर्जी या पश्चिम बंगाच्या राजकारणात अडकून पडल्या आहेत. तर प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं त्या राहुल गांधींना स्वतःच्या पक्षातूनच स्वीकारलं जात नाही, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यामुळं मोदींना रोखणारी ही नावं एकेक करून मागे पडू लागली आहेत. देशात सध्या विरोधी पक्ष असून नसल्यासारखीच स्थिती आहे. विरोधकांच्या या दयनीय अवस्थेला ते स्वतःच जबाबदार असल्याचं राजकीय वर्तुळात सांगितलं जात आहे. पंतप्रधान मोदींवर टीका करणं हा एककलमी कार्यक्रम विरोधकांकडून राबवण्यात येत आहे. पण दुसरीकडं महत्त्वाच्या मुद्द्यांकडं दुर्लक्ष करण्यात येत आहे. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर संसदेत पाठिंबा द्यायचा, मात्र रस्त्यावर विरोध करायचा असं चित्र गेल्या काही महिन्यांत पाहायला मिळत आहे. केवळ मोदींना विरोध करायचा एककलमी कारभार विरोधी पक्षांनी सुरू ठेवला. हेच भाजप आणि मोदींच्या पथ्यावर पडत आहे. हेच देशातील जनतेच्या मनावर बिंबवण्यास भाजप आणि मोदी राजकीयदृष्ट्या यशस्वी झाले, असे जाणकार सांगतात. विरोधकांच्या सध्याच्या दयनीय अवस्थेला विरोधकांनी भाजप आणि मोदींना जबाबदार न धरता स्वतःच आत्मपरीक्षण करावं, असं जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. सध्याच्या घडीला विरोधकांकडे मोदींना पर्याय ठरू शकेल असा एकही चेहरा नाही. मात्र, काँग्रेसने नितीश कुमारांकडे नेतृत्त्व द्यायचे ठरवल्यास मोदींच्या झंझावात रोखता येणे शक्य आहे, असं मत अलिकडेच प्रख्यात इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केलं होतं. पण आता ते नितीशकुमारही भाजपसोबत गेले आहेत. त्यामुळं २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना रोखणं विरोधकांसाठी अशक्य आहे, असं राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे.

bhiwandi east mla rais shaikh resigns
समाजवादी पक्षात भिवंडीवरून धुसफुस; रईस शेख यांचा पक्षाकडे आमदारकीचा राजीनामा
sattakaran, raigad lok sabha seat, mahayuti, maha vikas aghadi, candidates, dependent on alliance parties, win the seat, marathi news, raigad news, lok sabha seat 2024, election 2024, anant geete, shunil tatkare, shekap, congress, bjp, ncp, shivsena,
रायगडात मित्रपक्षांवर दोन्ही प्रमुख उमेदवारांची मदार
Loksabha Election 2024 BJD 33 percent women candidates
भाजपामध्ये असताना पटनाईक सरकारवर करायच्या जोरदार टीका; आता त्याच पक्षाकडून दोन महिला लढवणार निवडणूक
independent candidate loksabha
निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवार का राहतात उपेक्षित? काय आहेत कारणं?

सध्या देशात विरोधी पक्ष असूनही नसल्यासारखेच आहे. विरोधकांच्या या दयनीय अवस्थेला भाजप किंवा नरेंद्र मोदी यांना जबाबदार न धरता विरोधकांनी आत्मपरीक्षण करावं. – संतोष कुलकर्णी, विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली, लोकसत्ता