समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सपा-बसपाच्या युतीबाबत मोठी घोषणा केली असून भाजपाला सत्तेतून बाहेर ठेवणे हेच आपले लक्ष्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यासाठी २०१९ला आपण बसपासोबत निवडणूक लढवणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. त्यासाठी काही जागांचा त्याग करण्याची आपली तयारी असल्याचे अखिलेश यावेळी म्हणाले. जर यामुळे भाजपाला हारवता येणार असेल तर आपण तसे करण्यास तयार आहोत असेही अखिलेश यावेळी म्हणाले.


बसपासोबत आमची युती असून ती यापुढेही कायम राहील. भाजपाला हारवण्यासाठी जर आम्हाला दोन-चार जागांचे बलिदान द्यावे लागले तरी आम्ही मागे हटणार नाही, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. रविवारी उत्तर प्रदेशातील एका गावात उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

अखिलेश यांनी दावा केला की, निवडणूक पूर्व युतीमुळे नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये विजय मिळाला आहे. त्यामुळे यापुढेही ही युती कायम राहणार आहे. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाना साधताना अखिलेश म्हणाले, भाजपासाठी योगींनी प्रचार केलेली प्रत्येक जागा ते हारले आहेत. आम्ही कैराना आणि नुरपूर येथे गेलोही नाही मात्र तरीही निवडणूक जिंकलो. हा भाजपासाठी जनमत आपल्या विरोधात असल्याचा मोठा संदेश आहे.

दरम्यान, जागांबाबत चर्चा झाल्यानंतर मायावती पहिल्यापासूनच युतीसाठी तयार आहेत. त्यामुळे आता उत्तर प्रदेशातून आगामी लोकसभा निवडणूक सपा, बसपा आणि काँग्रेस मिळून लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.