गेल्या काही दिवसांमध्ये कर्नाटकात आणि खास करून बंगळुरूमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यातच आता तेथील प्रशासनाला नवा ताप झालाय. तेथे ३ हजार ३३८ रुग्ण असे आहेत ज्यांचा आता-पता काही लागत नाहीये. त्यांना शोधणे हे आता जिकरीचं काम झालं आहे. त्यांच्यामुळे संसर्ग आणखी वाढण्याची भीतीही निर्माण झाली आहे.

हे ३ हजार ३३८ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. पण त्यांचा कुठेही पत्ता नाही. त्यांचा शोध मोठ्या प्रमाणात घेण्यात येत असल्याचं बंगळुरू महापालिकेच्या वतीनं सांगण्यात येत आहे. बंगळुरू महापालिकेच्या आयुक्तांनी इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, या करोना रुग्णांनी टेस्टवेळी योग्य पत्ताच दिला नव्हता. त्यामुळे पॉझिटिव्ह आढळूनही त्यांना शोधताना अडचण येत आहे.

महापालिका आयुक्त मंजुनाथ प्रसाद यांनी स्पष्ट केले की, शहरात ३ हजार ३३८ करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा कुठेही पत्ता लागत (untraceable) नाही. त्यांनी फॉर्म भरला होता. पण त्यावर घराचा पत्ता आणि फोन नंबर चुकीचा लिहिला. तेच पोर्टलवर आले आहे.

धक्कादायक बाब अशी की कर्नाटकातील एकूण रूग्णांपैकी अर्ध्याहून अधिक रुग्ण हे बंगळुरू शहरात आहेत. शनिवारी एकाच दिवसात कर्नाटकात ५ हजारांहून अधिक रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यातील २ हजार हे केवळ बंगळुरू शहरातील होते.