देशभरात १ लाख ७० हजार ८४१ करोनारुग्णांना व्हेंटिलेटर्सची आवश्यकता असून ९ लाख २ हजार २९१ रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी शनिवारी दिली. देशातल्या करोना परिस्थितीसंदर्भात चर्चा करण्यासाठी सर्व मंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते. त्यांनी सांगितलं की १.३४ टक्के करोना रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत असून ०.३९ टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर ३.७० टक्के रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

देशातल्या एकूण गंभीर रुग्णांपैकी ४ लाख ८८हजार ८६१ करोना रुग्णांना आयसीयू बेड्सची आवश्यकता असून १ लाख ७० हजार ८४१ रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे. तर ९ लाख २ हजार २९१ रुग्णांना ऑक्सिजनची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

या बैठकीला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि रासायनिक आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय आणि केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय तसंच केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण राज्यमंत्री अश्वनी कुमार चौबे आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद के. पॉल हे उपस्थित होते.

रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव गिरीधर अरामने यांनी देशातल्या द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजनची निर्मिती, वाटप आणि पुरवठा यांच्या सद्यस्थितीबद्दल माहिती दिली. त्याचप्रमाणे करोना रुग्णांच्या ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीमुळे द्रवरुप ऑक्सिजनची निर्मिती वाढवल्याचंही त्यांनी सांगितलं.
प्रतिदिन ९४०० मेट्रिक टनहूनही अधिक ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. त्याचबरोबर ऑक्सिजनची आयात, ऑक्सिजन प्लांट्सची उभारणी, टँकरची उपलब्धता वाढवणं अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.