दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या निमलष्करी दलाच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने महिनाभरापूर्वी स्थापन केलेल्या निधीत लोकांनी २.१० कोटी रुपये जमा केले आहेत.या रकमेतील ६० लाख रुपये छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या  सीआरपीएफच्या २५ कर्मचाऱ्यांसाठी देण्यात आले आहेत.

‘भारत वीर’ संकेतस्थळाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शहिदांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी यावर एका महिन्यात २ कोटींहून अधिक रक्कम मिळाली आहे, असे ट्विट गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. ही कल्पना मांडणारा अभिनेता अक्षय कुमार याच्यासह सिंह यांनी गेल्या महिन्यात हे संकेतस्थळ व अ‍ॅप सुरू केले होते.

सामान्य नागरिक या पोर्टलला भेट देऊन, कर्तव्यासाठी वीरमरण पत्करलेल्यांच्या कुटुंबांना मदत म्हणून आपले योगदान देऊ शकतो. ही आर्थिक मदत थेट शहिदांच्या कुटुंबांच्या बँक खात्यात जमा होते, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. आतापर्यंत २.६० कोटी लोकांनी या संकेतस्थळाला भेट दिली आहे. हे संकेतस्थळ अडीच महिन्यांपूर्वी तयार करण्यात आले.