भारत आणि रशियामध्ये एस-४०० ट्रायम्फ मिसाइल सिस्टिम खरेदीचा करार महत्वाच्या टप्प्यावर पोहोचलेला असताना आता अमेरिकेकडून या करारामध्ये अडथळा आणला जाण्याची दाट शक्यता आहे. रशियाकडून एस-४०० ट्रायम्फ मिसाइल सिस्टिमची खरेदी महत्वाचा व्यवहार समजून त्यावर निर्बंध घालण्याचे संकेत अमेरिकेने दिले आहेत. अमेरिकेच्या सीएएटीएसए कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या देशांवर, संस्था आणि व्यक्तींवर निर्बंध घालण्याच्या आदेशावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे.

ट्रम्प यांनी या आदेशावर स्वाक्षरी करताच अमेरिकेने चीनवर निर्बंध घातले आहेत. कारण चीनने रशियाकडून एसयू-३५ फायटर जेट आणि जमिनीवरुन हवेत मारा करणारी एस-४०० मिसाइल सिस्टिम विकत घेतली आहे. अमेरिकेने सीएएटीएसए कायद्यातंर्गत इराण, रशिया आणि उत्तर कोरिया या देशांवर निर्बंध घातले आहेत. अमेरिकेच्या या कायद्यामुळे भारताच्या अडचणी वाढणार आहेत.

भारताची रशियाकडून पाच एस-४०० मिसाइल सिस्टिम विकत घेण्याची योजना आहे. हजारो कोटी रुपयांचा हा व्यवहार अंतिम टप्प्यात असताना आता अमेरिकेकडून आडमुठी भूमिका घेतली जाण्याची भिती आहे. एस-४०० ही जगातील अत्याधुनिक मिसाइल सिस्टिम असून शत्रूची मिसाइल, फायटर विमाने अचूकतेने टिपण्याची क्षमता या सिस्टिममध्ये आहे. भारत गेल्या कित्येक वर्षांपासून रशियाकडून अत्याधुनिक शस्त्रास्त्रे विकत घेत आहे.

दोन्ही देशांमध्ये दृढ लष्करी संबंध आहेत. अमेरिकेच्या या कायद्यामुळे अडचणी आणखी वाढणार आहेत. अलीकडेच झालेल्या टू प्लस टू बैठकीत एस-४०० च्या खरेदी व्यवहाराला परवानगी मिळावी यासाठी भारताकडून प्रयत्न करण्यात आले. पण अमेरिकेने अद्याप कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही. एस-४०० मिसाइल सिस्टिमचा भारताच्या शस्त्रास्त्र ताफ्यात समावेश झाला तर चीन, पाकिस्तानचे हवाई हल्ले विफल करता येतील.