गलवान व्हॅली पाठोपाठ चिनी सैन्यानं पूर्व लडाखमधील पॅगाँग सरोसर परिसरातही घुसखोरीचा प्रयत्न केला होता. त्यामुळे गलवान संघर्षानंतर काहीसा निवळत आलेला सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला. सध्या दोन्ही बाजूनी सीमेवर तणावाची स्थिती असतानाच भारताच्या हवाई दलात आज राफेल लढाऊ विमानांचा समावेश करण्यात आला. या विमानांचा समावेश झाल्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदींना चीन प्रश्नावरून लक्ष्य केलं.

युद्धाच्या प्रसंगात भारताला हवाई वर्चस्व मिळवून देणाऱ्या अत्याधुनिक ‘राफेल’ फायटर विमानांचा आज इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात समारंभपूर्वक समावेश करण्यात आला. अंबाला येथील हवाई दलाच्या तळावर हा शानदार सोहळा पार पडला. ४.५ जनरेशनचे हे फायटर विमान अनेक अंगांनी वैशिष्टयपूर्ण आहे. शत्रूला धडकी भरवणारी शस्त्रास्त्रे ही राफेलची खासियत आहे. या सोहळ्यानंतर ओवेसी यांनी ट्विट करत मोदींवर टीका केली.

“आपली सैन्य दलं चिनी सैन्याला उत्तर देताना सर्वोत्तम योगदान देत आहेत. पण आता हे संकट लष्करापुरतं राहिलेलं नाही. हे आता आपल्या देशाच्या नेतृत्वाबद्दलच आहे. जे कोणतीही कृती करताना दिसत नाही. मागील काही आठवड्यांपासून देशाचे पंतप्रधान का या मुद्यावर बोलत नाहीयेत. कदाचित मोराला खाऊ घालण्यातून ते मोकळे होतील, तेव्हा त्यांना देशातील लोकांना सांगायला वेळ मिळेल आणि आणि चीनचं नाव घेण्याचं धाडसही येईल,” अशी टीका ओवेसी यांनी केली आहे.

राफेलच्या पहिल्या तुकडीत पाच विमाने असून Golden Arrow म्हणून ही स्क्वाड्रन ओळखली जाईल. २९ जुलैला राफेल फायटर विमानांचे भारतात आगमन झाले होते. पूर्व लडाखमध्ये भारत व चीन यांच्यात सीमेवर प्रचंड तणावाची स्थिती असताना राफेल विमानांचा आज औपचारिकरित्या इंडियन एअर फोर्समध्ये समावेश झाला.