एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी मतांच्या राजकारणासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या हालचालींवर केंद्र आणि राज्य सरकारांकडून पाळत ठेवण्यात यावी, अशी मागणी सोमवारी काँग्रेसकडून करण्यात आली. ओवेसी मते मिळविण्यासाठी समाजात फुट पाडत आहेत. त्यांच्या या हालचालींवर काटेकोरपणे लक्ष ठेवले पाहिजे. त्यासाठी ओवेसी यांच्यावर पाळत ठेवण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेते टॉम वडक्कन यांनी केली. ओवेसी यांनी हैदराबादमध्ये आयसिसशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक केलेल्यांना कायदेशीर मदत करण्याची घोषणा केली होती. यानंतर भाजपसह अन्य विरोधी पक्षांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली होती. ओवेसी यांनी काढलेल्या उद्गारांमुळे देशद्रोह झाला असून दहशतवादाला प्रोत्साहन मिळाले आहे, असा आरोप करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका उत्तर प्रदेश बार कौन्सिलचे सदस्य अनिलकुमार बक्षी यांनी स्थानिक न्यायालयात दाखल केली होती.