मुस्लिम आणि ज्यूंच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून ऑक्सफर्डच्या प्रकाशनांमधून डुक्कर आणि डुक्करांशी संबंधित मजकूर वापरू नये आदेश ऑक्सफर्डने आपल्या पाठ्यपुस्तक लेखकांना दिले आहेत. परंतु, यामागे पॅरिसमध्ये ‘शार्ली एब्दो’वरील दहशतवादी हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या भीतीचे कारण असल्याचे बोलले जात आहे. इस्लामच्या नावाखाली जगभरात उच्छाद मांडणाऱया या दहशतवादी संघटनांच्या कचाट्यात आपण सापडू नये म्हणून ऑक्सफर्डकडून अशा प्रकारच्या सुचना देण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
अमेरिकेतील ‘रेडिओ४’ वरील एका कार्यक्रमात याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या निवेदकाची पत्नी ऑक्सफर्डसाठी एक पुस्तक लिहीणार आहे. त्याआधी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या प्रेसने तिला एक पत्र लिहिल्याचे निवेदकाने कार्यक्रमात सांगितले. या पत्रात डुक्कर आणि त्यासंदर्भातील अशी कोणतीही वस्तू, जिच्याकडे डुक्कराचे मांस म्हणून पाहिले जाऊ शकेल, अशा कोणत्याही गोष्टींचा उल्लेख करू नये अशी सूचना दिले आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या प्रेसने मात्र हल्ल्याच्या भीतीने सूचना देण्यात आल्याच्या शक्यतेला फेटाळून लावले आहे. “आमची पुस्तके जवळपास दोनशे देशांमध्ये खपतात. त्यामुळे लेखकांनी लिहीताना संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा यासाठी आम्ही अधूनमधून सूचना देत असतो. आमच्या सूचनांमध्ये देशनिहाय बदल होत असतात. तसेच नव्या उद्योन्मुख लेखकांनाही आम्ही वेळोवेळी संधी देत असतो आणि ती देताना देशनिहाय संस्कृती आणि भावनांचा विचार करून लिहीण्याची सूचना करणेही महत्त्वाचे आहे.” असे ऑक्सफर्डकडून सांगण्यात आले आहे.