चिदंबरम यांची सरकारवर टीका

निश्चलनीकरण म्हणजे नोटाबंदीनंतर आर्थिक विकास दर खाली येईल हा अंदाज खरा ठरला आहे, असे माजी केंद्रीय अर्थमंत्री व काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी सांगितले.

निश्चलनीकरणासारखी शोकांतिका कुणा देशाच्या वाटय़ाला येऊ नये असे सांगून ते म्हणाले की, ‘निश्चलनीकरण हे देशाच्या अर्थव्यवस्थेला घातक ठरले आहे. निश्चलनीकरणानंतरच्या दुसऱ्याच दिवशी आर्थिक विकासाचा दर दीड टक्क्य़ाने कमी होईल असे भाकित मी केले होते ते खरे ठरले आहे. २०१५-१६ मध्ये आर्थिक विकास दर ८.२ टक्के होता तो २०१७-१८ मध्ये ६.७ टक्के झाला. माझे म्हणणे खरे ठरले हे सांगताना मला आनंद होत नाही कारण त्यामुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे, पण लोकांनी सरकारला जाब विचारला पाहिजे याची जाणीव करून देण्यासाठी त्याची आठवण मी देत आहे.’

स्पीकिंग ट्रथ टू पॉवर या या पुस्तकाच्या ‘वैमाये वेलम’ या तामिळ आवृत्तीच्या प्रकाशनावेळी त्यांनी सांगितले की, पक्षपात संपवण्यासाठी प्रत्येकाने लिहिले व बोलले पाहिजे. ‘स्पीकिंग ट्रथ टू पॉवर’ या चिदंबरम यांच्या पुस्तकाचे प्रकाशन माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते झाले होते. चिदंबरम यांनी सांगितले की, ‘जातीभेद व राजकीय गैरप्रकार थांबले पाहिजेत. आर्थिक गैरप्रकार हे लिहून व बोलूनच सुधारतील असे मला वाटते’.