रजनीकांत, धीरुभाई अंबानी, रामोजी राव, श्रीश्री रविशंकर यांना पद्मविभूषण; महाराष्ट्रातून १६ जणांना बहुमान
बहुविध क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्यांसाठी प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली. रिलायन्स उद्योगसमूहाचे संस्थापक दिवंगत धीरूभाई अंबानी, रुपेरी पडद्यावरील महानायक रजनीकांत, ऑर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्रीश्री रविशंकर, माध्यमसम्राट रामोजी राव यांना दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मानला जाणारा पद्मविभूषण पुरस्कार घोषित झाला आहे. मूळचे मुंबईकर असलेले विख्यात अर्थशास्त्रज्ञ अविनाश दीक्षित यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. उल्लेखनीय म्हणजे महाराष्ट्रातून यंदा १६ जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
टेनिसपटू सानिया मिर्झा, आंतरराष्ट्रीय खात्याचे शिल्पकार राम सुतार, जागतिक कीर्तीची बॅडिमटन खेळाडू सायना नेहवाल यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम, अभिनेते अजय देवगण, प्रियंका चोप्रा, जाहिरात गुरू पीयूष पांडे, सिने दिग्दर्शक मधुर भांडारकर यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली आहे. शास्त्रीय संगीतातील योगदानासाठी गोव्याच्या तुलसीदास बोरकर यांनादेखील पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आहे. यंदा ११२ जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मुंबईवरील हल्ल्याप्रकरणी सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाला असून गोव्याचे संगीतकार तुळशीदास बोरकर यांचादेखील या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.