संपूर्ण जग करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. स्वत: पाकिस्तानही या व्हायरसमुळे त्रस्त आहे. पण या परिस्थितीतही काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानच्या नापाक दहशतवादी कारावाया सुरुच आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्यासाठी पाकिस्तानने एका नव्या दहशतवादी गटाची उभारणी केली आहे. ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ असे या संघटनेचे नाव आहे.

मागच्या काही आठवडयात जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ने घेतली आहे. पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबाच्या तीन टॉप दहशतवाद्यांचे या ‘द रेसिस्टन्स फ्रंट’वर नियंत्रण आहे. दिल्लीतील राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांना इंटेलिजन्स रिपोर्ट देण्यात आला आहे.

मागच्यावर्षी भारतीय संसदेने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले. त्यानतंर टीआरएफची उभारणी करण्यात आली. FATF कडून पाकिस्तानवर मोठा दबाव आहे. तो टाळण्यासाठी काश्मीरमधील दहशतवादाला स्थानिक रंग देण्याची पाकिस्तानची चाल आहे. FATF ने पाकिस्तानवर आर्थिक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्ज मिळवणे मुश्किल झाले आहे.

टीआरएफ, जेके पीर पंजाल पीस फोरम अशी नावे या दहशतवादी संघटनांना देण्यात आली आहेत. धार्मिक नावे टाळण्यात आली आहेत. दहशतवाद हा काश्मीरचा अंतर्गत विषय आहे असे भासवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. लष्कर-ए-तोयबाने टीआरएफची उभारणी केली आहे. सजाद जट्टकडे दक्षिण काश्मीरची, खालिदकडे मध्य काश्मीर आणि हंजला अदनानकडे उत्तर काश्मीरची जबाबदारी आहे.