राजकीय अस्थिरता, तालिबानी आक्रमणे आणि अनागोंदी यामुळे त्रस्त झालेल्या पाकिस्तानच्या सरकारने आणि केंद्रीय कायदे मंडळाने आपला नियोजित कालावधी पूर्ण करीत इतिहास रचला आहे. एकीकडे हंगामी पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करायची याबाबत राष्ट्रीय नेतृत्वामध्ये तीव्र मतभेद असतानाच, कायदे मंडळाने आपला कालावधी पूर्ण केला आहे.कोणत्याही राजकीय शक्तीद्वारे अथवा लष्करी उठावाद्वारे पाक कायदे मंडळ तसेच केंद्र सरकार विसर्जित न होण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे. देशातील लोकशाहीवादी शक्तींचा पाठिंबा मिळाल्यामुळेच हे घडू शकले, असे सांगत पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांनी देशातील जनतेचे आभार मानले. एकाच वेळी अनेक-आरोपांचा आणि नकारात्मक शक्तींचा सामना करत पाक कायदे मंडळ आणि सरकारने मिळवलेले यश हे ऐतिहासिकच म्हणावे लागेल, असे अश्रफ यांनी स्पष्ट केले.