उधमपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करणाऱ्या नावेदने भारतीय हद्दीत घुसण्याचा मार्ग आणि भारतातील त्याच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती याबाबत परस्परविरोधी आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याने मंगळवारी त्याची ‘लाय डिटेक्टर’ चाचणी घेण्यात आली.
दिल्ली न्यायालयाच्या आदेशानुसार नावेदला केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेत आणण्यात आले. त्याची पॉलिग्राफ चाचणी करण्यापूर्वी त्याला एकांतात ठेवण्यात आले होते.गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसह विविध सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी या चाचणीच्या वेळी हजर होते. चाचणीचा सविस्तर तपशील अद्याप प्रलंबित आहे.भारतात घुसखोरी करताना तुझ्याबरोबर किती जण होते, तू कोणाकोणाला भेटलास आणि दोन महिने कोठे वास्तव्य केले आदी प्रश्न नावेदला विचारण्यात आले. मात्र त्याने किती जण होते आणि कोणत्या मार्गाने भारतात प्रवेश केला त्याबद्दल परस्परविरोधी माहिती दिली, गाडीच्या क्रमांकाबद्दलही त्याने चुकीची माहिती दिली.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने नावेदच्या आवाजाचे आणि डीएनएचे नमुनेही घेतले आहेत. डीएनए चाचणीच्या नमुन्यांमुळे त्याचे राष्ट्रीयत्व सिद्ध होण्यास मदत होणार आहे.
फरारी साथीदारांची रेखाचित्रे ‘एनआयए’कडून जारी
नवी दिल्ली- उधमपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणारा पाकिस्तानचा दहशतवादी मोहम्मद नावेद याकूब याच्या अन्य दोघा
फरार साथीदारांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) त्यांची रेखाचित्रे जारी केली आहेत. इतकेच नव्हे तर त्यांना पकडण्यासाठी उपयुक्त ठरणारी माहिती देणाऱ्यास पाच लाख रुपयांचे इनामही जाहीर करण्यात आले आहे.सदर दोघा फरारी दहशतवाद्यांची नावे झारगन ऊर्फ मोहम्मद भाई (३८) आणि अबू ओकाशा (१८) अशी असून त्यांच्याबाबतची माहिती देणाऱ्यास प्रत्येकी पाच लाख रुपयांचे इनाम देण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता त्याच दिवशी म्हणजे ५ ऑगस्ट २०१५ रोजी नावेदला पकडण्यात आले. भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी हे तिघे भारतीय हद्दीत घुसले होते. एनआयए त्यांचा कसून शोध घेत आहे. उधमपूरमध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान ठार झाले होते.