नकळत नियंत्रण रेषा ओलांडल्यामुळे पाकिस्तानच्या तावडीत सापडलेला  राष्ट्रीय रायफल्सचा जवान जवान चंदू चव्हाण आमच्या ताब्यात असल्याची कबुली पाकिस्तानने दिली आहे. पाकिस्तानच्या लष्करी कारवाई प्रमुखांनी (डीजीएमओ) चंदू चव्हाणला इस्लामाबादमध्ये ठेवण्यात आल्याचे सांगितले. यापूर्वी भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी लष्कराच्या आयएसपीआर या प्रसारमाध्यम विभागाशी संपर्क साधण्यात आला तेव्हा त्यांनी आमच्या ताब्यात कोणताही भारतीय सैनिक नसल्याचे सांगितले होते. भारताने काही दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले होते. या कारवाईत भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त केले होते. यावेळी तब्बल ३८ अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. त्यानंतर काही वेळातच चंदू चव्हाण हे पूंछ येथील नियंत्रण रेषेजवळून पाकिस्तानच्या हद्दीत गेले. पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून भारतीय सैनिकाला पकडल्याचे सांगण्यातही आले होते. मात्र, काही दिवसांनंतर पाकिस्तानने घुमजाव करत चंदू चव्हाण आमच्या ताब्यात नसल्याचे म्हटले होते. लष्करी जवान चुकून दुसऱ्या देशाच्या हद्दीत गेल्यास ‘स्ट्रॅटेजिक सोल्जर एक्स्चेंज’अंतर्गत लष्कर कारवाई करत असते. मात्र, आता पाकिस्तानने घुमजाव केल्याने चंदू चव्हाण यांच्या सुटकेबद्दल शंका निर्माण झाली आहे.

आपला नातू पाकिस्तानच्या ताब्यात सापडल्याचा धक्का सहन न झाल्याने चंदू चव्हाण यांच्या आजी लीलाबाई चिंधा पाटील (चव्हाण) यांचे निधन झाले होते. चंदू चव्हाण हे २३ वर्षांचे असून ते मुळचे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर येथील आहेत. लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्समध्ये ते जवान म्हणून कार्यरत आहेत.