स्थानिक नागरिकांकडून जोरदार विरोध होत असतानाही पाकिस्तानी लष्कर आपल्या देशातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांना पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बल्टिस्तान या भागात हलवत आहे. मीरपूर आणि अन्य भागांमध्ये विशेष क्वारंटाइन सेंटर बनवण्यात आले आहेत अशी माहिती पीओकेमधील सूत्रांनी दिली.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांना पाकिस्तानी लष्कराकडून पीओकेमध्ये आणले जात आहे. पाकला पंजाब प्रांतामध्ये साफसफाई करायची आहे. लष्करी तळ आणि लष्करी कुटुंब राहत असलेल्या भागांमध्ये एकही करोनाग्रस्त रुग्ण नकोय असे आदेश पाकिस्तानी लष्कराकडून देण्यात आले आहेत.

पीओकेमधील मीरपूर आणि गिलगिट-बल्टिस्तान भागामध्ये करोनाग्रस्तांना आणले जात आहेत. गिलगिट-बल्टिस्तानमधील नागरीक करोनाग्रस्त रुग्णांसाठी क्वारंटाइन सेंटर उभारायला विरोध करत आहे. कारण त्या भागात पायाभूत सोयी-सुविधा नाहीत तसेच प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सुद्धा कमतरता आहे. करोनाचा प्रादूर्भाव पीओकेमध्ये पसरण्याची भिती येथील नागरिकांना आहे.

पाकिस्तानच्या वरिष्ठ नेतृत्वाला पीओके, गिलगिट-बल्टिस्तानची अजिबात चिंता नाही. पंजाबच्या तुलनेत हा भाग राजकीय दृष्टया त्यांच्यासाठी तितका महत्वाचा नाही. पाकिस्तानात झपाटयाने करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. पाकिस्तानमधील एक हजार २२ रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे २१ ते ३० वयोगटातील आहेत, अशी माहिती पाकिस्तानी पंतप्रधानांचे विशेष सहाय्यक असणाऱ्या डॉ. झफर मिर्झा यांनी दिली आहे