पाकिस्तानने दहशतवादविरोधी लढाईसाठी विमानांचा वापर करण्याची अपेक्षा
पाकिस्तानला एफ -१६ विमाने देऊ नयेत अशी मागणी करणारा ठराव सिनेटने फेटाळला असून, आता त्या देशाला ही लढाऊ जेट विमाने मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ७०० दशलक्ष डॉलर्सची ही विमाने असून, ती पाकिस्तानला देऊ नयेत कारण तो देश विश्वास ठेवण्याजोगा नाही असे सांगून काही वरिष्ठ सिनेटर्सनी पाकिस्तानला एफ १६ लढाऊ विमाने विकण्यास विरोध केला होता. सिनेटमध्ये मांडलेल्या संयुक्त ठरावात रिपब्लिकन पक्षाचे माजी अध्यक्षीय उमेदवार रँड पॉल यांनी असे म्हटले होते, की पाकिस्तानला एफ १६ या लढाऊ जेट विमानांची विक्री करण्यात येऊ नये. हा ठराव ७१ विरुद्ध २४ मतांनी फेटाळला गेला आहे. अशा ठरावांना पूर्वी फार पाठिंबा मिळत नसे, पण या वेळी २४ सिनेटर्सनी दिलेला पाठिंबा ही आश्चर्याची बाब मानली जाते.
भारताने आठ एफ १६ जेट विमाने पाकिस्तानला विकण्यास विरोध केला होता. या विमानांची किंमत ७०० दशलक्ष डॉलर्स असून, त्याचा वापर पाकिस्तानने दहशतवाद विरोधी लढाईत करावा अशी अपेक्षा अमेरिकेला आहे.

पॉल यांनी चर्चेला सुरुवात करताना सांगितले, की ओसामा बिन लादेनला शोधण्यात मदत करणारे पाकिस्तानी अमेरिकी डॉक्टर शकील आफ्रिदी यांचा पाकिस्तान छळ करीत आहे. पाकिस्तानने अमेरिकेसाठी चांगले काम करणाऱ्यांना तुरुंगात टाकले आहे, अशा देशाला आपण विमाने देणे अयोग्य आहे. परराष्ट्र संबंध समितीचे सिनेटर ख्रिस मर्फी यांनी सांगितले, की पाकिस्तान हा भरवशाचा भागीदार नाही व यापूर्वी दहशतवादी विरोधातील लढाईत पाकिस्तानने दगाबाजी केली आहे. आता दहशतवादाची अवस्था फार पुढे गेली असून त्यांच्यावर बॉम्ब टाकून काही उपयोग होणार नाही. अमेरिकेने पाकिस्तानला मदत देण्यापासून रोखू नये असे आवाहन पेंटॅगॉनने केल्यानंतर मतदान घेण्यात आले. पॉल यांनी शस्त्रे निर्यात नियंत्रण कायदा १९७६चा आधार घेत पाकिस्तानला विमाने नाकारण्याचा ठराव मांडला होता. अफगाण-पाकिस्तान यांचे संबंध अमेरिकेला डोकेदुखी आहे. पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सची मदत देऊनही तो देश तालिबानला मदत करीत आहे. पाकिस्तानला अनुदानित दरात विमाने देऊ नयेत असे मला वाटते, असे पॉल यांनी सांगितले. त्यांना २४ सिनेटर्सचा पाठिंबा मिळाला.

याने काहीच साध्य होणार नाही – र्पीकर
नवी दिल्ली : अमेरिकेने पाकिस्तानला एफ १६ विमानांची विक्री करण्यास मान्यता दिली असली, तरी त्यामुळे दहशतवादाशी लढण्यात पाकिस्तानला मदत होईल, असे आपल्याला वाटत नाही, असे संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांनी सांगितले. लोकसभेत एका लेखी प्रश्नावर त्यांनी म्हटले आहे, की अमेरिकेने पाकिस्तानला एफ १६ लढाऊ विमाने देण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्यावर आम्ही नाराजी कळवली आहे. पाकिस्तानला विमाने दिल्यास त्याचा वापर दहशतवादविरोधी लढाईत होईल, हे अमेरिकेचे तर्कट आपल्याला पटत नाही. गेल्या महिन्यात भारताने अमेरिकी राजदूत रिचर्ड वर्मा यांना बोलावून पाकिस्तानला एफ १६ लढाऊ विमाने देण्याच्या ओबामा प्रशासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.