कर्तारपूर गुरूद्वारावरून पाकिस्तानची एक नवी कुरापत पुन्हा एकदा समोर आली आहे. कर्तारपूर गुरूद्वाराच्या देखभालीची जबाबदारी पाकिस्तान शीख गुरूद्वारा समितीकडून काढून घेत नव्या संस्थेला सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे गुरूद्वाराच्या देखभालीसाठी निवडण्यात आलेल्या या संस्थेत एकाही शीख सदस्याला स्थान देण्यात आलेलं नाही. आता कर्तारपूर गुरूद्वाराच्या देखभालीची जबाबदारी प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटला स्थापन सोपवण्यात आली आहे.

कर्तारपूर गुरूद्वाराच्या देखभालीची जबाबदारी प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटला सोपवण्यात आली असून यामध्ये असलेले सर्व ९ सदस्य हे Evacuee Trust Property Board (ईटीपीबी) शी संबंधित आहे. ईटीबीपी या संस्थेवर पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयचं वर्चस्व असल्याचं सांगण्यात येतं. प्रोजेक्च मॅनेजमेंट युनिटच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी मोहम्मद तारीक खान यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या या निर्णयानंतर भारतातूनही याला विरोध करण्यात आला आहे. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख बादल यांच्याकडूनही पाकिस्तानच्या या निर्णयाला विरोध करण्यात आला आहे. “पाकिस्तानच्या या निर्णयाचा आम्ही विरोध करत आहोत. पाकिस्तान सरकारनं गुरूद्वाराच्या देखभालीची जबाबदारी अशा संस्थेकडे दिली आहे ज्यात एकही शीख सदस्य नाही हे निषेधार्ह आहे. पाकिस्तानातील शीख अल्पसंख्यांकांच्या अधिकारावर ही गदा आहे,” अशी प्रतिक्रिया शिरोमणी अकाली दलाच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली.

काय आहे कर्तारपूर कॉरिडोअर ?

शीख धर्मीयांचे आद्यगुरू गुरू नानक यांनी सन १५०४ मध्ये रावी नदीच्या पश्चिम तीरावर कर्तारपूर वसवले. ९ नोव्हेंबर रोजी त्यांची ५५० वी जयंती होती. तेव्हा आपल्याकडील गुरुदासपूर जिल्ह्य़ातले डेरा बाबा नानक आणि पाकिस्तानातील दरबार साहिब किंवा कर्तारपूर साहिब यादरम्यान ४.७ किलोमीटर लांबीची मार्गिका याच दिवशी सुरू होणे हे समयोचितच. कर्तारपूर मार्गिकेचा प्रस्ताव १९९९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि नवाझ शरीफ यांच्यातील भेटीदरम्यान प्रथम चर्चिला गेला. दिल्ली-लाहोर बस सेवेच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाले, त्याच वेळी कर्तारपूर मार्गिकेची बीजे रोवली गेली होती.