मुंबईवरील २६/११च्या हल्ल्या संदर्भातील महत्त्वाचे पुरावे भारताने पाकिस्तानला सुपूर्द केले आहेत. हल्ल्यातील प्रमुख सात आरोपींसह कमांडर झकिऊर रहेमान लकवी याच्या सहभागाबाबत ६०० पानी ठोस पुरावा देण्यात आला आहे. यात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची सत्य प्रतही आहे.
नऊ मृत दहशतवाद्यांचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांचे जबाब आणि मुख्य तपास अधिकाऱ्यांचा अहवाल यांचा या पुराव्यांत समावेश आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानच्या न्यायालयीन समितीने या संदर्भातील खटल्यासाठी मुंबईच्या मुख्य शहर दंडाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्या भेटीचा वृत्तांत तसेच दहशतवाद्यांकडील साधनांची मागणी करणारा पाकिस्तानातील वरिष्ठ सरकारी वकिलांचा अर्ज यांची प्रत पाकिस्तानला देण्यात आली आहे.
पाकच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारताकडे अधिक पुराव्याची मागणी केली होती. मात्र या हल्ल्याचे नियोजन, प्रशिक्षण व अर्थसहाय्य पाकिस्तानातूनच झाल्याने हे पुरावे पाकला तेथेच सापडतील, असे सडेतोड उत्तर भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे देण्यात आले आह़े