पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना कॉन्स्युलर अॅक्सेस देण्यात यावा, अशी मागणी भारतानं पुन्हा पाकिस्तानकडे केली आहे. तसेच पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या मुंबईतील हामिद नेहाल अन्सारी यांनाही कॉन्स्युलर अॅक्सेस देण्यात यावा, असंही भारतानं म्हटलं आहे. याआधीही भारतानं १६ वेळा जाधव यांना कॉन्स्युलर अॅक्सेस देण्याची मागणी केली होती. तर अन्सारी हे २०१२ मध्ये अवैधरित्या पाकिस्तानात गेल्याचं सांगण्यात येतं. त्यांनाही राजनैतिक मदत दिली जावी, असं भारताकडून सांगण्यात आलं आहे.

भारताच्या नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणावरुन दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. जाधव यांच्यावर हेरगिरी तसेच देशविरोधी कृत्य केल्याचे आरोप लावण्यात आले होते. या प्रकरणात पाकिस्तानने काही दिवसांपूर्वीच नवी खेळी खेळली होती. पाकिस्तानच्या इंटर- सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने (आयएसपीआर) जाधव यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांकडे दयेचा अर्ज केल्याचा दावा केला होता. पाक लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली होती. जाधव यांनी हेरगिरी, दहशतवादी कृत्य केल्याची कबुली दिल्याचे पाकिस्तानने म्हटले होते. माझ्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले असून माझ्या या कृत्यांसाठी मला माफी द्यावी, असे जाधव यांनी म्हटल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. गफूर यांनी जाधव यांचा दयेचा अर्जदेखील ट्विटरवर शेअर केला होता. मात्र त्या अर्जावर जाधव यांची स्वाक्षरी नव्हती. त्यामुळे या अर्जाविषयी शंका उपस्थित होत आहे.