भारताने ‘चांद्रयान-२’ चे यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर भारताचा शेजारी असणाऱ्या पाकिस्तानने आता २०२२ पर्यंत पहिला अंतराळवीर अवकाशात पाठवण्याची घोषणा केली आहे. चीनच्या मदतीने पाकिस्तान पुढील चार वर्षांमध्ये पहिला अंतराळवीर अवकाशात पाठवणार असल्याची माहिती पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी दिली आहे.

अवकाशात अंतराळवीर पाठवण्याच्या पाकिस्तानच्या या पहिल्या महत्वकांशी मोहिमेसाठी अंतराळवीरांची निवड प्रक्रिया पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून सुरु होईल अशी माहिती चौधरी यांनी दिली आहे. चौधरी यांनी ट्विटवरुन या मोहिमेसंदर्भात माहिती दिली आहे. ‘सर्वांना सांगायला अभिमान वाटतोय की अंतराळात पहिला पाकिस्तानी अंतराळवीर पाठवण्यासाठीची निवड प्रक्रिया फेब्रुवारी २०२० ला सुरु होईल. निवड प्रक्रियेमध्ये ५० जणांची निवड केली जाईल. त्यामधून अंतिम २५ जण निवडले जातील. २०२२ मध्ये आम्ही आमच्या देशातील पहिला अंतराळवीर अंतराळात पाठवणार आहोत. देशाच्या अंतराळ संशोधनासंदर्भातील हा सर्वात महत्वाचा क्षण असेल,’ असे ट्विट चौधरी यांनी केले आहे.

पाकिस्तानी हवाई दल अंतराळवीर निवड प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका बजावणार असल्याचेही चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. ‘जगभरामध्ये वैमानिकांनाच अंतराळ मोहिमेवर पाठवले जाते. त्यामुळेच अंतराळवीर निवड प्रक्रियेची सर्व जबाबदारी हवाई दलावर असणार आहे,’ अशी माहिती चौधरी यांनी ‘डॉन न्यूज’च्या वेबसाईटशी बोलताना दिली आहे. ‘सुरुवातीला ५० वैमानिकांची निवड केली जाईल त्यामधून २५ जणांना निवडले जाईल. त्यातूनही अंतिम १० जणांची निवड करुन त्यांना प्रशिक्षण दिले जाईल आणि शेवटी त्यापैकी एकाला अंतराळात पाठवले जाईल,’ असं चौधरी यांनी सांगितलं.

२०१८ मध्ये पाकिस्तानने दोन घरगुती बनावटीचे उपग्रह चीनच्या मदतीने अंतराळात सोडले आहेत. लाँग मार्च (एलएम-टूसी) रॉकेटच्या सहाय्याने गोबीच्या वाळवंटामधील चीनच्या अंतराळ केंद्रातून हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले होते, असं द एक्सप्रेस ट्रेब्युनच्या वृत्तामध्ये म्हटले आहे. यापैकी एक अपग्रह हा ‘दूरस्थ संवेदन उपग्रह’ (पीआरएसएस वन) असून तो पृथ्वीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि ऑप्टिकल उपग्रह (संवादासंदर्भातील) म्हणून वापरला जातो. तर दुसरा उपग्रहाचे नाव पीएके-टीईसी-वनए असं असून त्याचा उपयोग देशातील उपग्रह निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी केला जात आहे.