पाकिस्तानी रेंजर्सनी सीमेवरील छावण्यांवर केलेल्या गोळीबारात १ युवक ठार, तर इतर दोनजण जखमी झाले आहेत. पाकिस्तानने गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून जम्मू जिल्ह्य़ातील आंतरराष्ट्रीय सीमेनजीक असलेल्या खेडय़ांमध्ये सीमेवरील सैनिकांनी तोफगोळ्यांचा मारा केला.
सीमा सुरक्षा दलाने गोळीबार करून पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. दिवस व रात्र दोन्ही बाजूने गोळीबार सुरूच होता.
सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्तयाने सांगितले की, पाकिस्तानी रेंजर्सनी लहान शस्त्रे व तोफगोळ्यांच्या मदतीने जम्मू जिल्ह्य़ातील कनाचक व परगवाल या भागात पहाटे ५.४० वाजता तोफगोळ्यांचा मारा केला. त्यांनी आंतरराष्ट्रीय सीमेवरील किमान १२ चौक्या व खेडय़ांना आर. एस. पुरा क्षेत्रात लक्ष्य केले. पाकिस्तानी रेंजर्सनी सीमेवरील खेडय़ात हल्ले केले त्यात संजय कुमार हा जम्मूतील परगवाल येथील हमीरकोना येथील बावीस वर्षांचा युवक ठार झाला. कनाचक व परगवाल या सीमेनजीकच्या भागात घबराट निर्माण झाली आहे. सीमा सुरक्षा दलाचे जवान अर्जुन के व एक मुलगा परगवाल व आर. एस. पुरा भागात जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. आज शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने पाकिस्तानी रेंजर्सनी ऑगस्ट महिन्यात एकूण आठ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे. २ व ३ ऑगस्टला पाकिस्तानी तुकडय़ांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. कृष्णागटी, मंडी तसेच पूंछ व जम्मू जिल्ह्य़ातील बालाकोट व पालनवाला भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. १ ऑगस्टला दोनदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी आर. एस. पुरा या आंतरराष्ट्रीय सीमेवरील भागात तोफगोळ्यांचा मारा केला आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी अखनूर या जम्मू जिल्ह्य़ातील भागातही तीन छावण्यांवर गोळीबार केला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात जुलैमध्ये १८ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले असून त्यात तीन जवानांसह चार ठार व १४ जण जखमी झाले आहेत.

सीमेवरील १२ चौक्यांवर गोळीबार.
हमीरकोनात येथे युवक ठार.
ऑगस्ट महिन्यात आठ वेळा शस्त्रसंधी उल्लंघन.