News Flash

..तर पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र ठरवू!

अल काइदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला ठार केल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवाद पुरस्कृत करणारा देश म्हणून जाहीर

| November 6, 2013 04:54 am

अल काइदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला ठार केल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवाद पुरस्कृत करणारा देश म्हणून जाहीर करण्याची तसेच लादेनच्या अबोटाबाद येथील घरात पाकिस्तानचे दहशतवादी संघटनांशी कसे लागेबांधे आहेत हे जाहीर करण्याची धमकी दिली होती अशी नवीन माहिती आता एका पुस्तकाच्या माध्यमातून बाहेर आली आहे.
‘मॅग्नीफिसंट डेल्यूजन्स’ या पाकिस्तानचे अमेरिकेतील माजी राजदूत हुसेन हक्कानी यांच्या पुस्तकातील दाव्यानुसार लादेनला ठार केल्यानंतर अमेरिकेच्या अफगाणिस्तान व पाकिस्तान यांच्यातील राष्ट्रीय सुरक्षा मंडळाचे समन्वयक निवृत्त लेफ्टनंट जनरल डग्लस ल्यूट यांनी पाकिस्तानला दहशतवाद पुरस्कृत करणारा देश म्हणून जाहीर करण्याची धमकी दिली व लादेनच्या अबोटाबाद येथील निवासस्थानी पाकिस्तानचे दहशतवादी संघटनांशी असलेले संबंध उघड करणारे पुरावे उघड करण्याचे सूतोवाचही केले होते. जनरल ल्यूट यांनी हक्कानी यांना १२ मे रोजी व्हाइट हाऊस येथे भेटीस बोलावले होते त्यावेळी लादेनला ठार करण्याच्या कारवाईला साधारण पंधरवडा उलटत आला होता, पाकिस्तानात अमेरिका विरोधी भावना तीव्र होत्या.
पाकिस्तान दहशतवादाला मदत करीत असल्याचे खूप पुरावे उपलब्ध झाले आहेत, त्यामुळे पाकिस्तानला हा दहशतवाद पुरस्कृत करणारा देश म्हणून जाहीर करण्याचा आमचा विचार आहे अशी छुपी धमकी ल्यूट यांनी दिल्याचे हक्कानी यांनी म्हटले आहे.
लादेन याला ठार केले त्यावेळी अबोटाबाद येथील त्याच्या निवासस्थानी अमेरिकेच्या नेव्ही सील्स पथकाला अनेक पुरावे मिळाले आहेत व अनेक प्रश्नांना उत्तरे नसताना पाकिस्तान उगाचच आवाज चढवित आहे. जर हा आवाज थांबला नाही तर हे पुरावे आम्ही जगासमोर मांडू, पाकिस्तानचा दहशतवादाला पाठिंबा जगजाहीर केल्यानंतर अमेरिकी लोक व काँग्रेस पाकिस्तानला दहशतवाद पुरस्कृत करणारा देश म्हणून घोषित करण्याची मागणी करतील असेही ल्यूट यांनी म्हटले होते.
त्यानंतर सप्टेंबरमध्ये पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार यांची न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या बैठकी निमित्ताने अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांच्याशी भेट झाली त्यावेळीही पाकिस्तान दहशतवादी संघटनांना खतपाणी घालीत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. हक्कानी नेटवर्क, पाकिस्तानी लष्कर व आयएसआय यांच्यातील संबंध आम्हाला माहीत आहेत असे क्लिंटन यांनी खार यांना सांगितले होते. पाकिस्तानी गुप्तचर हे हक्कानी गटाला माहिती देतात व त्यामुळे त्यांचे दहशतवादी सुरक्षित ठिकाणी जातात असे अमेरिकेला त्यावेळी वाटत होते. अमेरिकेने आतापर्यंत क्यूबा, इराण, सुदान व सीरिया अशा चार देशांना दहशतवाद पुरस्कृत करणारे देश म्हणून जाहीर केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 4:54 am

Web Title: pakistan warned it could be declared a terrorist state us
टॅग : Us
Next Stories
1 बांगला देशात निमलष्करी दलाच्या १५२ सैनिकांना मृत्युदंड
2 परप्रांतीयांच्या मुद्यावरुन रशियातही संघर्ष
3 अमेरिकी परराष्ट्र विभागातर्फे निरूपमा राव यांना निरोप
Just Now!
X