इस्लामाबाद : पाकिस्तानच्या अण्वस्त्र धोरणात बदल झालेला नसून आम्ही अण्वस्त्रांचा प्रथम वापर करणार नाही, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने पंतप्रधान इम्रान खान यांनी अणुयुद्धाच्या शक्यतेबाबत केलेल्या विधानानंतर स्पष्ट केले आहे.

लाहोर येथील गव्हर्नर हाउस येथे  शीख समुदायाच्या झालेल्या बैठकीत त्यांनी सोमवारी सायंकाळी सांगितले की, भारत व पाकिस्तान हे दोन्ही अण्वस्त्रधारी देश आहेत. जर त्यांच्यात तणाव वाढत गेला, तर त्यामुळे जगाला धोका निर्माण होऊ शकतो. आम्ही आमच्याकडून अण्वस्त्रांचा प्रथम वापर करणार नाही. किंबहुना आम्ही भारताविरोधात युद्धही सुरू करणार नाही.

काश्मीरप्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचे केलेले प्रयत्न फसल्यानंतर काश्मीरच्या मुद्दय़ावर भारताबरोबर अणुयुद्धाची शक्यता इम्रान खान यांनी वेळोवेळी वर्तवली आहे. इम्रान खान म्हणाले, युद्ध हा या प्रश्नावरचा उपाय नाही. त्यात जो जिंकेल तो पराभूत झालेला असेल कारण युद्धातून इतर अनेक समस्या जन्माला येतात.

पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते महंमद फैजल यांनी  म्हटले आहे, इम्रानखान यांच्या वक्तव्याचे चुकीचे अर्थ लावण्यात आले असून अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याचे आमचे धोरण कायम आहे.  पाकिस्तानच्या अण्वस्त्र धोरणात बदल झालेला नाही.

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ऑगस्टमध्ये असे सांगितले होते, भारत अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याचे धोरण परिस्थिती पाहून बदलू शकतो. ’