आरोग्यासाठी कष्ट करणे आवश्यक आहे. पण त्यालाही काही मर्यादा आहे. कष्टाचा अतिरेक आरोग्यासाठी घातक असून त्यामुळे पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता असते, असे मत ब्रिटिश वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले. सध्याच्या आधुनिक युगात अधिक पैसे कमाविण्यासाठी अधिक वेळ काम केले जाते, पण आठवडाभरात तुम्ही ५५ तासांपेक्षा अधिक वेळ काम केले, तर तुम्हाला नक्कीच पक्षाघाताचा झटका येऊ शकतो, असा दावा या तज्ज्ञांनी केला आहे.
लंडन विद्यापीठात ‘साथीचे आजार’ या विषयाचे प्राध्यापक असलेल्या मिका किविमाकी यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अधिक कष्ट आणि आजार या संदर्भात संशोधन केले आहे. अधिक वेळ काम केल्याने मेंदू आणि हृदयावर ताण पडतो आणि परिणामी पक्षाघाताचा झटका येऊ शकतो, असे किविमाकी यांनी सांगितले. या आरोग्यतज्ज्ञांनी युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामधील विविध स्त्री-पुरुषांचा अभ्यास केला.
ज्या व्यक्ती आठवडाभरात ५५ तासांपेक्षा अधिक वेळ काम करीत होत्या, अशा काही व्यक्तींना हृदयविकाराची लक्षणे आढळली. अधिक कष्ट करणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता १३ टक्क्यांनी अधिक असते, तर काही व्यक्तींना पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यताही १.३ पट अधिक असते, असे किविमाकी यांनी सांगितले. या संशोधकांनी तब्बल ६,०३,८३८ व्यक्तींचा साडेआठ वष्रे अभ्यास केला. अधिक वेळ काम करणाऱ्यांना धूम्रपान, मद्यपान आदी व्यसने लागतात, पण त्याचबरोबर उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल आदी हृदयाशी संबंधित विकारही जडतात, असेही या संशोधकांनी सांगितले.

एका आठवडय़ात केवळ ३५ ते ४० तास काम करणे आवश्यक आहे. मात्र एखादी व्यक्ती जर ५५ तासांपेक्षा अधिक वेळ काम करीत असाल तर ते आरोग्यासाठी धोकादायकच आहे. अधिक कष्ट करणाऱ्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराची लक्षणे आढळतात. प्रसंगी त्यांना पक्षाघाताचा झटकाही येऊ शकतो.
मिका किविमाकी, ब्रिटिश शास्त्रज्ञ

’ आठवडय़ातून ४१ ते ४८ तास काम करणाऱ्या व्यक्तीला पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता १० टक्के अधिक असते.
’आठवडय़ातून ४३ ते ५४ तास काम करणाऱ्या व्यक्तीला पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता २७ टक्के अधिक असते.