भारताला हानी पोहोचवणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेला जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल. मात्र, हे प्रत्युत्तर कसे, केव्हा आणि कुठे द्यायचे हा निर्णय आमचा असेल, असे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले. ते सोमवारी दिल्लीतील एका उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग यांच्यासह अनेक उच्चपदस्थ लष्करी अधिकारी उपस्थित होते. यावेळी पर्रिकर म्हणाले की, दुसऱ्यांना नुकसान पोहोचवणाऱ्यांना तशाच प्रकारच्या वेदनेचा अनुभव आल्याशिवाय ते बदलत नाहीत, ही इतिहासाची शिकवण आहे. मी याबाबतीत सरकारी पद्धतीने विचार होऊ नये, या मताचा आहे. तुम्हाला एखाद्याने दुखापत केल्यास त्याला तीच भाषा समजते, यावर माझा विश्वास आहे. मात्र, ते कसे, केव्हा आणि कुठे द्यावे, याची निवड तुमची असावी. परंतु, जर कोणी या देशाला हानी पोहोचवली तर त्या व्यक्ती अथवा संघटनेला अशा कृत्यांसाठी तशाच प्रकारची वेदना सहन करावी लागेल. मी या ठिकाणी व्यक्ती अथवा संघटना हे शब्द जाणीवपूर्वक वापरत असल्याचे यावेळी पर्रिकरांनी सांगितले. आपण जोपर्यंत त्यांना वेदना देत नाही, मग ते कोणीही असो, तोपर्यंत अशा घटना कमी होणार नाहीत, हे मूलभूत सूत्र असल्याचेही यावेळी पर्रिकरांनी सांगितले.