लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने एकदिलाने काम केले. विधानसभा निवडणुकीतही तसे होईल पण, मुख्यमंत्रिपद भाजपलाच मिळेल, याची खबरदारी पक्ष संघटनेने घ्यावी, अशी सूचना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या सुकाणू समितीच्या बैठकीत केल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेसाठीही भाजप-शिवसेना युती कायम राहणार असून तसा संदेश राज्यभर पोहोचवला जाणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे राज्याचा दौरा करणार आहेत.

महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणा या राज्यांमध्ये चार महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी काय करता येईल, यावर तीन्ही राज्यांच्या भाजप नेत्यांशी अमित शहा यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली. प्रत्येक राज्यासाठी जागांचे लक्ष्य निश्चित करण्यात आल्याचेही समजते. सुकाणू समितीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह चंद्रकांत पाटील, आशीष शेलार, पंकजा मुंडे आदी वरिष्ठ नेते रविवारी दिल्लीला आले होते.  शहा यांच्या बैठकीपूर्वी महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील भाजप नेत्यांची बैठक झाली.  त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसाठी रोडमॅप तयार असून राज्यातील भाजप नेते आणि पक्ष संघटना निवडणुकीच्या मूडमध्ये आहे! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासारखे काही नेते भाजपमध्ये प्रवेश करत असून त्यांना मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. विधिमंडळाचे अधिवेशन १७ जून रोजी सुरू होत असून त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचित केले. शहा यांच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ६ जूनला झालेल्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केल्याचे सांगितले जाते.

निवडणूक होईपर्यंत दानवेच : पक्षांतर्गत निवडणुकीचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असून त्यासाठी शहा यांनी १३-१४ जूनला बैठक बोलावली आहे. नवा राष्ट्रीय पक्षाध्यक्ष तसेच अनेक राज्यांतील प्रदेशाध्यक्षांच्याही नियुक्त्या केल्या जाणार आहेत. ज्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत तेथे प्रदेशाध्यक्ष बदलला जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुका होईपर्यंत रावसाहेब दानवे यांच्याकडेच प्रदेशाध्यक्षपद कायम राहण्याची शक्यता आहे.

जागावाटपाबाबत संदिग्धता

बैठकीत युतीच्या जागावाटपाबाबतचे चित्र स्पष्ट झालेले नाही. भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांबरोबरच मित्र पक्षांचेही उमेदवार निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवा, असे पक्षाध्यक्ष शहा यांनी राज्यातील नेत्यांना सांगितले असले, तरी भाजप मित्रपक्षांना आपल्या कोटय़ातून जागा देणार की एकूण जागांपैकी ठरावीक जागा देणार, हा प्रश्न अनुत्तरित राहिला.