योग गुरु बाबा रामदेव यांनी आपल्या पतंजली ब्रॅण्डच्या प्रसिद्धीसाठी तयार केलेल्या ‘किम्भो’ या चॅट अॅपचे लॉन्चिंग पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. किम्भो अॅप २७ ऑगस्ट रोजी लॉन्च करण्यात येणार होते. मात्र, या अॅपमधील सुरक्षा विषयक फिचर्सचे निराकरण केल्यानंतर या अॅपचे लवकरच लॉन्चिंग करण्यात येईल असे पतंजलीकडून सांगण्यात आले आहे.

पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी सोमवारी ट्विटद्वारे याची माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, किम्भो अॅप अधिक सुरक्षित आणि वापरण्यात सोपे करण्यासाठी त्यात आवश्यक बदल करण्यात येत आहेत. त्यामुळे लवकरच आम्ही या अॅपच्या लॉन्चची नवी तारीख जाहीर करू. ‘किम्भो अॅप’ हे स्वदेशी अॅप असून व्हॉट्सअॅपला पर्याय म्हणून ते तयार करण्यात आले आहे. किम्भो अॅप पहिल्यांदा ३० मे रोजी लॉन्च करण्यात आले होते. मात्र, २४ तासांच्या आतच ते मागे घेण्यात आले.

बोलो चॅट अॅपचे निर्माते अदिती कमाल यांच्या अॅपचे रिब्राडिंग करु ते पतंजलीसाठी किम्भो अॅप म्हणून आणण्यात आले आहे. कमाल आपली बोलो मेसेंजर सेवा वेगळी लॉन्च करणार आहेत. किम्भो या नावाबाबत सांगताना पतंजलीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, किम्भो हा संस्कृत शब्द आहे. किम्भो अॅपमध्ये AES इन्क्रिप्टेड तसेच घोस्ट चॅटिंग आणि ऑटो डिलीट सुविधा असणार आहेत.

या अॅपमध्ये व्हिडिओ, फोटो, डूडल, स्टिकर, जीआयएफ या सगळ्या गोष्टी वापरता येणार आहेत. व्हॉट्सअॅपला पर्याय म्हणूनच ते लॉन्च करण्यात येणार आहे. या अॅपवरुन व्हिडीओ चॅटिंगही करण्यात येणार असून डूडल तयार करुन ते आपल्या मित्रांसोबत शेअरही करता येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.