‘मीडिया पार्ट’ या शोधपत्रकारिता नियतकालिकासाठी काम करणाऱ्या देशातील दोन पत्रकारांच्या फोनमध्ये पेगॅसस हे स्पायवेअर टाकण्यात आल्याचे फ्रान्सच्या एएनएसएसआय या सायबर सुरक्षा संस्थेने म्हटले आहे.

इस्रायलच्या एनएसओ समूहाने तयार केलेले हे स्पायवेअर काही व्यक्तींच्या स्मार्टफोनमध्ये टाकण्यात आल्याच्या या प्रकरणात पहिल्यांदाच पाळत ठेवण्यात आल्याच्या प्रकाराला पुष्टी देणारी माहिती हाती आली आहे. फ्रान्सच्या एएनएसएसआय या संस्थेने केलेल्या तपासणीत दोन पत्रकारांच्या मोबाईल फोनमध्ये स्पायवेअर टाकण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

याआधी अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या सायबर सुरक्षा प्रयोगशाळेनेही असाच निष्कर्ष काढला होता. हे स्पायवेअर टाकण्याचे सोपस्कार, तारखा व कालावधी हे सर्व काही फ्रान्समधील चौकशीशी जुळणारे आहे असे मीडियापार्टने म्हटले आहे.

पेगॅसस प्रकरणाचा पर्दाफाश सतरा माध्यम संस्थांनी केला होता. त्यांनी त्यांचे निष्कर्ष जाहीर करताना असे म्हटले होते, की इस्रायली स्पायवेअरच्या मदतीने स्मार्टफोन हॅक करण्यात आले.