विधिमंडळ नेतेपदी पेमा खांडू; बंडखोर स्वगृही

अरुणाचल प्रदेशात काँग्रेस सरकार पुन्हा प्रस्थापित करण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर शनिवारी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून नाबाम तुकी यांच्या ऐवजी पेमा खांडू यांचे नाव जाहीर केले आहे. आता खांडू हे ४५ आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेचा दावा करतील, त्यात दोन अपक्षांचा समावेश आहे. वेगाने घडलेल्या घडामोडीत खालिको पूल हे काँग्रेसचे बंडखोर मुख्यमंत्री तीस बंडखोर आमदारांसह काँग्रेसमध्ये परत आले आहेत. त्यांना भाजपने फूस लावली होती व राष्ट्रपती राजवटीनंतर पूल हे अरुणाचलचे मुख्यमंत्री होते.

विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश तथागत रॉय यांनी दिला होता त्यानंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली, त्यात पेमा खांडू यांची नवीन नेते म्हणून निवड करण्यात आली. पेमा खांडू हे दिवंगत मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे पुत्र आहेत. तुकी यांनी खांडू यांचे नाव सुचवले. ते ४४ आमदारांनी मान्य केले. विधानसभा अध्यक्ष नाबाम रेबिया बैठकीस अनुपस्थित होते तर हकालपट्टी झालले मुख्यमंत्री खालिको पुल हे बंडखोरांसह उपस्थित होते. विधिमंडळ पक्ष बैठकीच्या आधी तुकी यांनी राज्यपालांची भेट घेऊन विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा देण्याचा इरादा जाहीर केला. आसामचे मंत्री हिमंता बिस्वास यांनी ईशान्येकडील राज्ये काँग्रेस मुक्त होतील असे म्हटले होते त्यावर तुकी यांनी जोरदार टीका केली.

पेच मिटला

  • काँग्रेसचे राज्यातील बंडखोर आमदार पूल यांच्या नेतृत्वाखाली पक्षात परत आले आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तुकी यांचे सरकार पाडले होते.
  • पूल यांनी ११ भाजप आमदार व बंडखोर आमदार यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले होते. आता कुठलेही मतभेद राहिलेले नाहीत, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हस्तक्षेप केल्याने पक्षात एकजूट झाली आहे.