देशभरात खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंवर सर्वोच्च न्यायालयाने काळजी व्यक्त केली आहे. खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दहशतवादी हल्ल्यापेक्षा जास्त आहे अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे. न्यायाधीश मदन लोकूर आणि गुप्ता यांच्या खंडपीठाने अनेक लोकांचा मृत्यू खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये होत असल्याचं सांगितलं. तसंच रस्ते सुरक्षेशी संबंधित समितीला यामध्ये लक्ष घालण्याचा आदेश दिला आहे.

‘देशातील कित्येक लोक खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातामुळे मृत्यूमुखी पडत आहेत. मिळालेल्या अहवालानुसार, दहशतवादी हल्ल्यात जितके लोक मारले जात नाहीत, त्यापेक्षा जास्त लोक खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडत आहेत’, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. हा अत्यंत गंभीर मुद्दा असून हो एखाद्याच्या आयुष्याचा प्रश्न असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे.

‘हा अत्यंत गंभीर मुद्दा असून खड्ड्यांमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांना भरपाई दिली गेली पाहिजे’, असं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे. न्यायालयाने रस्ते सुरक्षा समितीला यासंबंधी दोन आठवड्यात आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं आहे. देशातील रस्ते सुरक्षेसंबंधी प्रकरणावर सुनावणीदरम्यान न्यायालायने आपलं म्हणणं मांडलं आहे.

खड्ड्यांमुळे गेल्या वर्षभरात ३५९७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये ७२६ जण महाराष्ट्रातील आहेत.