गेल्या तीन आठवडय़ांतील २२वी इंधन दरवाढ करून केंद्र सरकारने सोमवारी काँग्रेसच्या दरवाढीविरोधातील देशव्यापी आंदोलनाला आणखी ‘इंधन’ पुरवले. करोना संकटाच्या काळात लोकांना मदत करण्याऐवजी सरकारने दरवाढीतून खंडणीचा नवा प्रकार सुरू केल्याची टीका करत काँग्रेसने देशभर निदर्शने केली.

डिझेलच्या दरात सोमवारी १३ पैशांनी, तर पेट्रोलच्या दरात ५ पैशांनी वाढ करण्यात आल्याचे सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. गेल्या तीन आठवडय़ांमध्ये केलेली ही २२वी वाढ आहे. गेल्या २१ दिवसांमध्ये डिझेलचा दर प्रतिलिटर ११.१४ रुपयांनी, तर पेट्रोलचा दर ९.१७ रुपयांनी वाढला आहे.

दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ८०.३८ रुपयांवरून ८०.४३ रुपये झाला आहे, तर डिझेलदर ८०.४० रुपयांवरून ८०.५३ रुपयांवर गेला आहे. प्रत्येक राज्यातील स्थानिक कर आणि मूल्यवर्धित (व्हॅट) करानुसार इंधनाचे दर वेगवगळे असतील.

दरम्यान, बैलगाडय़ा, घोडागाडय़ा आणि सायकलवर स्वार होत काँग्रेसच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी सोमवारी पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात देशभर आंदोलन केले. निदर्शने करणाऱ्या अनेक काँग्रेसनेते-कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. इंधन दरवाढ तातडीने मागे घेण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली. दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूमध्ये काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.

मुंबईत पेट्रोल ८७.१९ रुपये

मुंबईमध्ये पेट्रोलचा प्रति लिटर दर ८७.१९, तर डिझेलचा प्रति लिटर दर ७८.८३ इतका झाला आहे. ७ जूनपासून डिझेलच्या दरांत सलग २२ वेळा वाढ करण्यात आली, तर पेट्रोलच्या दरात २१ वेळा वाढ झाली आहे.

खंडणीचे हे नवे उदाहरण : सोनिया गांधी

नवी दिल्ली: करोना टाळेबंदीच्या काळात भाजप सरकारने इंधन दर २२ वेळा वाढवल्याचा आरोप करत खंडणीचे हे नवे उदाहरण असल्याची टीका काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली. संकटकाळात लोकांच्या मेहनतीच्या कमाईतून नफा कमावणे नव्हे, तर त्यांना मदत करणे हे सरकारचे कर्तव्य असते, असा टोलाही सोनिया यांनी लगावला.